Tuesday, June 16, 2026
Latest NewsLIFESTYLE

पुणेकर कलारसिकांना ‘व्हीनस आर्ट फेस्ट’ची मेजवानी; ९ ते ११ जून दरम्यान आयोजन

पुणे  : चित्रप्रदर्शनासोबतच, पोट्रेट, वॉटरकलर प्रकारच्या चित्रांची रेखाटने, प्रात्यक्षिके आणि प्रतिथयश कलाकारांना भेटण्याची संधी असलेला ‘व्हीनस आर्ट फेस्ट’ पुणेकर कलारसिकांना अनुभविता येणार आहे. सुरेंद्र करमचंदानी यांच्या संकल्पनेतून आणि आर्ट पुणेचे संजीव पवार यांच्या पुढाकाराने सदर कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवार दि ९ जून ते रविवार दि ११ जून, २०२३ दरम्यान घोले रस्यावरील पं जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे महोत्सव संपन्न होईल. महोत्सव सर्व कलारसिकांना विनामूल्य खुला आहे, याची कृपया नोंद घ्यवी.

शुक्रवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ वाजता व्हीनस आर्ट फेस्टचे उद्घाटन सुप्रसिद्ध पेपर मॅशे कलाकार भारती पित्रे व उद्योजक अजय पित्रे यांच्या हस्ते होईल. सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे हे देखील या वेळी उपस्थित असतील. उद्घाटनानंतर प्रमोद कांबळे व्यक्तिचित्र या चित्रकलेतील प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. शिवाय पु ल देशपांडे यांची सही असलेल्या १९१९ या नव्या पेनच्या मॉडेलचे अनावरण यावेळी होईल.

पुण्यासारख्या शहरात कलाकार, कलाप्रेमी, कला शाखेचे विद्यार्थी आदींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच यासंबंधीची रेखाटने, प्रात्यक्षिके यांचे आयोजन करीत एक संवाद प्रास्थापित व्हावा या उद्देशाने २०१३ सालापासून सदर कलामहोत्वाचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातील कलाप्रेमींचे हक्काचे ठिकाण असलेले व्हीनस ट्रेडर्स हे येत्या १० जून रोजी ५० व्या वर्षांत पदार्पण करीत असताना यावर्षीचा हा महोत्सव खास असल्याचे सुरेंद्र करमचंदानी यांनी आवर्जून सांगितले. महोत्सवाच्या तीनही दिवशी भगवद्गीता आणि वाल्मिकी रामायण हे ग्रंथ अनोख्या पुस्तक संचाच्या स्वरूपात उपस्थितांना पाहता येतील अशी माहितीही त्यांनी दिली.  

महोत्सवाची अधिक माहिती देताना संजीव पवार म्हणाले, “येत्या ९ ते ११ जून दरम्यान होणाऱ्या प्रदर्शनात चित्रप्रदर्शन, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. व्यावसायिक व ज्येष्ठ चित्रकार, कलाशाखेचे विद्यार्थी आणि हॉबी आर्टिस्ट (हौशी कलाकार) अशा तीन विभागात चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात एकाच छताखाली तब्बल १०० कलाकृती पाहण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे. याबरोबरच येत्या ६ व ७ जून रोजी सायं ४ ते ७ दरम्यान प्रसिद्ध चित्रकार पोट्रेट, वॉटर कलर प्रकारच्या चित्रांची प्रात्यक्षिके दाखविणार आहेत. यापैकी पोट्रेट प्रकारात आर डी कांबळे, आदित्य शिर्के, मंजिरी मोरे, उत्तम साठे तर वॉटरकलर प्रकारात संजय देसाई, संदीप यादव, शंतनू साळुंखे, शैलेद्र एम, विलास कुलकर्णी आदी कलाकार प्रात्यक्षिक दाखवतील. याबरोबरच ११ जून रोजी चिंटूचे निर्माते असलेले चारुहास पंडित हे देखील चिंटूच्या मॅस्कॉट सोबत उपस्थितांना प्रात्यक्षिक दाखवतील. महोत्सवात दाखविली जाणारे प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम हे देखील सर्वांसाठी विनामूल्य आहेत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading