कार चालकाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षाच्या चिमूरडीचा चाकाखाली येऊन मृत्यू
हाय प्रोफाईल सोसायटीतील लग्न समारंभातील घटना
ठाणे : कारचालक व्हिडिओ पाहत गाडी पार्क करत असताना कारच्या मागच्या बाजूला खेळत असलेल्या एका चार वर्षाच्या चिमूरडीचा चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडीत घडली. भिवंडी येथे एका हाय प्रोफाईल सोसायटीत लग्न समारंभावेळी ही घटना घडल्याने परिसरात शोकाकळा पसरली आहे. अलिना अकरम मंसूरी (वय 4) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल 5 जून ला भिवंडी शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी असलेल्या बागे यूसुफ इमारतीतील रहवासी समसुल्लाह मंसूरी यांच्या मुलाचा निकाह होता. यावेळी अनेक पाहुणे मंडळी त्यांच्या घरी आले होते. यामध्ये अलिना मंसूरी ही सहकुटूंब या कार्यक्रमासाठी आली होती. सोसायटी हॉलमध्ये निकाहाच समारंभ सुरू होता. तेव्हा दुसरे एक कुटूंब फॉर्च्यूनर कारमध्ये या निकाह समारंभासाठी पोहोचले. पाहुणे कार मधून खाली उतरल्यावर कार चालक गाडी पार्क करायला गेला. मात्र यावेळी कारचालक कारच्या सर्व काचा बंद करून व्हिडिओ पाहू लागला. अन् गाडी पुढे मागे करत असतानाच कारच्या मागच्या चाकाखाली येवून अलिना चिरडली गेली. यावेळी शेजारी असलेल्या नागरिकांनी चालकाला थांबण्यासाठी आवाज दिला. मात्र चालकांचे सगळे लक्ष हे व्हिडिओ पाहण्यात होते. यातच पुन्हा गाडी रिवर्स घेतल्याने पुन्हा कारचे चाक चिमूकलीच्या आंगावरून गेले. हा सर्व प्रकार इतका भयानक होता की निकाह समारंभावर शोककळा पसरली. दरम्यान, अलिनाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
