जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ‘सीन अनसीन थॉट्स’ प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई : येथील सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुबई येथे दिनांक ६ ते १२ जून २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन कलारसिकांसाठी सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत विनामूल्य खुले असेल. बंगाल आणि लखनौ येथील सुप्रसिद्ध कलाकारांच्या चित्र, शिल्प, सिरॅमिक्स आणि ग्राफिक्स कलाकृतींचे हे एक वैविध्यपूर्ण प्रदर्शन आहे.
या प्रदर्शनामध्ये अब्दुल सलाम, गौतम दास, अंजू पालीवाल, श्रीहरी दत्ता, दसरथ दास, राकेश साधक, दिवाकर चंद्रा आणि ईशान केवलरामानी या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे.

आपल्या मनात जे विचार येतात ते जगासमोर येतीलच असं नाही. अनेकदा ते आपल्याला प्रदर्शित करायचे नसतात. पण कलाकरांना मात्र आपल्या भावना प्रकट करण्याची एक विलक्षण उर्मी असते. आणि त्यांची कला ही या भावना प्रकट करण्याचं एकमेव माध्यम असतं. ‘सीन अनसीन थॉट्स’ हे प्रदर्शन याचं भावनिक उर्मीच दृश्य स्वरूप आहे.
हे प्रदर्शन म्हणजे समकालीन कलाकारांच्या भावनांचं आणि जगापुढे सहसा न येणाऱ्या विचारांचा कलाकृतींच्या माध्यमातून केलेलं प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन म्हणजे कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृतींचा विहंगम असा संग्रह आहे. या प्रदर्शनात समकालीन दृष्टीकोन आणि विचार प्रक्रियेसह रेखाचित्रे, ग्राफिक्स, पेंटिंग्ज, शिल्पकला, सिरॅमिक्स इत्यादी पारंपारिक माध्यमांच्या संगमाचं विहंगम दृश्य कला दर्शकांना अनुभवता येईल.’सीन असीन थॉट्स’ या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातील वेगवेगळ्या शैलीतील आणि वेगवेगळे विचार मांडणाऱ्या उत्कृष्ट कलाकृती होय. या प्रदर्शनातील चित्रकार हे आपापल्या माध्यमात आणि कलाशैलीत विशेष प्राविण्य मिळवून आहेत. त्यामुळे कलारसिकांना या प्रदर्शनातून समकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळेल हे निश्चित. विषयाच्या वैविध्यमुळे कला रसिकांच्या कला जाणिवा उंचावणारे हे प्रदर्शन आवर्जून पाहण्यासारखे आहे.
