Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

शिवराज्याभिषेकाचे स्मरण करीत महाराष्ट्रातील देवालयात अभिषेक 

पुणेः छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करून लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली. महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे महाराज आधारवड ठरले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून विश्व हिंदू परिषद व महाराष्ट्रातील तमाम गुरव समाज, ब्राह्मण पुरोहित वर्ग वर्षभर हिंदूंच्या पवित्र देवालयातून शिवराज्याभिषेकाची स्मरण करीत पूज्य देवतांना अभिषेक करणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद मठ मंदिर समिती पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मनोहर ओक यांनी दिली.

या उपक्रमाची सुरुवात शिवराज्याभिषेक दिन २ जून २०२३ (तिथीप्रमाणे ) ते ६ जून २०२३ (तारखेप्रमाणे) असा विधिवत कार्यक्रम होणार असून वर्षभर विविध देवालयातून अशा प्रकारचा कार्यक्रम राबविले जाणार आहे. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवगाथेस उजळा दिला जाणार आहे. शिवरायांनी सांस्कृतिक वारश्याची जपणूक करीत महाराष्ट्रातील आणि देशातील देव, भूमी आणि धर्म यांचे रक्षण केले.  बऱ्याच मंदिरांतील परंपरेचे व्यवस्थापन उत्तम रीतीने चालविण्याची व्यवस्था केली. पूजा- अर्चा, देखभाल, मंदिर व्यवस्थापन यासाठी वर्षासने, सनद, निधी, संरक्षण उपलब्ध करून दिले. त्याला हे अनोखे अभिवादन होणार आहे.

मनोहर ओक  म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान आराध्य दैवत आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाने त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागता ठेवला. शिवराय म्हणजे महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा, महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतिकच आहेत. त्यांचा राज्याभिषेक दिन म्हणजे आपल्या सर्वांचा मानबिंदू आणि शिवरायांच्या संघर्षपूर्ण कालखंडाचा, महाराजांच्या अद्भुत प्रतिभेचा, दिव्यत्वाचा, अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार स्मरण क्षण आणि अद्भूत प्रेरणागाथाच होय. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी करिता ९५७९८७८१३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading