fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : – पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री  शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाच वरून दहा कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता पंचवीस वरून पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री  शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोहोंनीही दिले.

वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना देण्यात येणारा निधी दुप्पट केला आहे, तत्काळ वितरीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून होणारी कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी मंत्रालयीन स्तरावरील नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी प्रत्यक्ष पंढरपूर आणि क्षेत्रीयस्तरावर पोहचून देखरेख व संनियत्रण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

पंढरीच्या आषाढीच्या वारीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री  शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पुणे विभागीय आय़ुक्त सौरभ राव, अक्षय महाराज भोसले तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की, पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवा. यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करा. विभागातील आजुबाजुच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घ्या. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली याकरिता काळजी घ्या. वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवा. औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करा. पंढरपूरमधील रस्त्यांसाठी निधी दिला आहे. त्यातून पंढरपूर नगरपालिका आणि आजुबाजुच्या रस्त्यांचे डांबरीकरण करा. त्यामध्ये नगरपालिकेचा रस्ता, ग्रामपंचायतीचा रस्ता असे हद्दीच्या विषयातून रस्त्यांची कामे मागे ठेवू नका. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर चिखल किंवा राडा-रोडी दिसता कामा नये याची दक्षता घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालखी मार्गासह वारीत येणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले. ते म्हणाले की, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये यासाठी पोलीस विभागाने स्टीकर्स किंवा पासेसच्या माध्यमतून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये असे नियोजन करावे. पालखी मार्गावरील टोल नाके सुरु होणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जी-२० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार वारी..

जी-२० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपुरची वारी आणि त्या अनुषंगाने या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतील या वैशिष्ट्यपूर्ण अशा वारीचे दर्शन घडवा, त्यासाठी उत्तम नियोजन करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री  विखे-पाटील, पाटील यांनीही सहभाग घेतला. वारीच्या नियोजनासाठी पालखी मार्ग आणि पंढरपूरसह, वारी मार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन नियोजनाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीत पुणे विभागीय आयुक्त राव यांनी पालखी मार्ग तसेच वारीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावर्षी वारीकरिता ६० टक्क्यांनी अधिकचे मनुष्यबळ तसेच पाण्याकरिता टँकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत असल्याची माहिती राव यांनी दिली. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.
बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाच्या सचिव सोनिया सेठी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनुटिया आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading