Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

भाजपने शनिवार, नारायण, सदाशिव, नवी पेठ आणि व्यापारी पेठ आणली धोक्यात !

पुणे : भाजपच्या नदी काठ सुधार या महत्वाकांक्षी प्रकल्पाने मध्यवर्ती प्रामुख्याने शनिवार, नारायण, सदाशिव आणि नवी पेठेत राहणाऱ्या हजारो नागिरकांचे भविष्य आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य दृष्ट्या धोक्यात आणले आहे. यासोबतच मध्यवर्ती पेठेतील व्यापारी पेठेवरही याचा खूप मोठा परिणाम होणार असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे महापालिकेच्यावतीने मुळा – मुठा नदीकाठ सुधार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे 44 कि. मी. च्या या कामाच्या दोन स्ट्रेचच्या निविदा प्रक्रिया मान्य करण्यात आल्या असून बंडगार्डन येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेच्या पुढील टप्प्यात मुठा नदीचा संगमवाडी ते खडकवासला पर्यंतच्या भागाचे कामाचे नियोजन असून याचा आराखडा देखील मंजूर आहे.
या आराखड्या नुसार नदी काठावर अगदी खेटून असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ , नवी पेठ आणि या भागातून कर्वे रोड, सिंहगड रोड, डेक्कन, महापालिका भवन कडे जाण्या येण्यासाठीचा नदी पात्रातील रस्ता बंद करण्यात येणार आहे. तसेच बहुचर्चित भिडे पूल, वृद्धेश्वर घाटावरील पूल काढून टाकण्यात येणार असून महापालिकेमागील टिळक पुलही वापरात राहणार नाही. आजमितीला वाड्यात राहणारे बहुतांश नागरिक तसेच व्यापारी पेठेत येणारे ग्राहक त्यांची चारचाकी वाहने, रिक्षा – टेम्पो सारखी व्यावसायिक वाहने नदी पात्रातील रस्त्यांच्या कडेला पार्क करतात. ही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे अनेक स्थानिक आणि व्यावसायिक ओंकारेश्वर मंदिर चौक आणि बालगंधर्व व टिळक पुलावर दुतर्फा वाहने उभी करतात.
नदी पात्रातील हे पूल आणि रस्ता बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्थेचा कुठलाच पर्याय देण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यात सध्या अस्तित्वात असलेल्या छोट्या रस्त्यांवरच मोठ्या प्रमाणावर बेशिस्तपणे पार्किंग होऊन त्याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिकांना बसणार आहे. यातून वादाचे प्रसंग उद्भवणार असून वाहतूक कोंडी व प्रदूषण मोठयप्रमाणावर होणार आहे, अशी भीती येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
यासोबतच या आराखड्यात नदी पात्रामध्ये शहरातील गोळा होणारे मैला पाणी प्रक्रिया करून सोडण्यात येणार आहे. नदीपात्र बारमाही पाण्याने भरलेले राहावे यासाठी गरवारे महाविद्यालया मागील भागात बंधारा बांधून पाणी अडविण्यात येणार आहे. तसेच संगम महा पालिका भवन मागे देखील बंधाऱ्याचे नियोजन आहे. यामुळे परिसरातील पाण्याचे स्रोत देखील प्रदूषित होण्याची भीती आहे. तसेच पाण्याचा वास आणि डासांचा उपद्रव होऊन आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे, असे येथील सुजाण नागरिक सांगतात.
या योजनेचा आराखडा मंजूर करताना विरोधक, सामाजिक संस्था आणि माध्यमानीही यावर प्रकाश टाकला. परंतु प्रशासन आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी याबाबत अद्यापही कुठलिही ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही. किंबहुना मतदार म्हणून स्थानिक नागरिकांसोबत कुठलीही चर्चा न करताच हा प्रकल्प थोपवण्यात आला आहे. नदी आणि नदी काठ सुधार योजनेला विरोध नाही मात्र अनेक पिढ्यांपासून येथे राहणाऱ्या नागरिकांपुढे भविष्यातील मोठ्या संकटचाही टांगती तलवार ठेवल्याचेही येथील नागरिक सांगत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading