अशाच स्पर्धांमुळे देशाला पॅरालिम्पिक खेळाडू मिळतील अजित पवार यांना विश्वास
पुणे : राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेत मुला-मुलींनी चमकदार कामगिरी केली. अशा स्पर्धा दिव्यांग खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरतात. भविष्यात याच स्पर्धांमधून आपल्याला पॅरालिम्पिकसाठी खेळाडू मिळतील. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपल्याला १९ पदके होती. मात्र, आपला नंबर २४वा होता. भविष्यात पॅरालिम्पिकमध्ये आपल्याला मोठी झेप घ्यायची आहे. त्याची पायाभरणी अशा स्पर्धांमधूनच होत असते, असे मत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग कल्याण आयुक्तालय आणि श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा समारोप म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत झाला. पारितोषिक वितरण समारंभात पवार बोलत होते. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख, प्रशांत नारनवरे, बी. ए. सोळंकी, प्रवीण कोरगंटीवार, संजय कदम, संयोजक प्रदीप गारटकर उपस्थित होते.
पवार म्हणाले, या स्पर्धेत गेले तीन दिवस दिव्यांग बाल मित्रांच्या जीवनात नक्कीच वेगळा आनंद भरला असेल. त्यांना खेळण्याची, सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्याची, आत्मविश्वासाची नवीन अनुभूती या निमित्ताने मिळाला. हा आनंद त्यांच्या मनात कायम राहिल. या स्पर्धेतून हे खेळाडू नवीन उर्जा घेऊन जातील. गेले काही दिवस तुम्ही नवीन आव्हानांचा सामना केला. मात्र, अशा स्पर्धांमुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहण्यास मदत होते. जीवनात स्पर्धा अपरिहार्य गोष्ट आहे. स्पर्धा आपल्याला खूप काही शिकवून जाते. स्पर्धेत कोणी जिंकते, कोणी हारते. मात्र, यातून विजयाचा आनंद कसा साजरा करायचा आणि पराभव कसा पचवायचा, हेदेखील आपल्याला शिकायला मिळते. पराभवाचे दु:ख उगळत बसायचे नसते आणि जिंकल्याचा आनंद मिरवत राहायचा नसतो. या दोन्ही गोष्टी सकारात्मक पद्धतीने तुम्ही स्वीकारल्या, तर जगणं अधिक सोप्पं, आनंदी होईल. जिद्द, कष्ट आणि परिश्रम घेण्याच्या बाबतीत दिव्यांग बांधव कुठेही कमी नसतात. जगण्याच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला संघर्ष करावा लागतो. त्यामुळे तुमची शारीरिक मानसिक कसोटी लागते. मात्र, तुम्ही इतरांपेक्षा मजबूत असतात. ही मजबुती टिकवून तुम्हाला पुढे जायचे आहे.
ते पुढे म्हणाले, की महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने मला राज्यातून पॅरालिम्पिक खेळाडूही पुढे जावे असे वाटते. अशा स्पर्धामधून भविष्यातील पॅरालिम्पिक खेळाडू घडतील. राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल करतील. चांगले दिव्यांग खेळाडू आपल्या राज्यात, देशानत नावारुपाला येतील, अशी मला आशा आहे.
राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ
चंद्रकांत पाटील म्हणाले, दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धा दोन वर्षांच्या करोना संकटानंतर संपन्न झाल्या. याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आपल्या शरीरातील एखादा भाग नसताना, आपण अपंग असताना, दिव्यांग असताना, अभ्यासासोबतच खेळात प्रावीण्य मिळवायचे हे सोपे काम नाही. या मुलांची कामगिरी पाहून मी थक्कच झालो. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करणाऱया संयोजकांचे, दिव्यांग विभागाशी जोडलेल्या सर्व अधिकाऱयांचे आणि त्या-त्या शाळेत शिकविणाऱया शिक्षकांचे अभिनंदन करतो. कारण स्पर्धा ही कुठलीही सोपी नसते. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने होणारा बहुदा हा शेवटचा कार्यक्रम असेल. कारण आता दिव्यांग मंत्रालयाच्या वतीने दिव्यांगाच्या विकासाचे सर्व कार्यक्रम होतील. वेगळे मंत्रालय असेल, तर विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो. उच्च शिक्षणमंत्री असल्याने सातत्याने विचार करीत असतो, वेगवेगळे विद्यापीठ कसे होतील. त्यामुळे दिव्यांगांसाठीचे वेगळे विद्यापीठ कसे होईल, याचा विचार केला आहे. मागील पॅराऑलिम्पिकमध्ये आपण चमकदार कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळाल्यावर आपण क्लास वनची नोकरी देतो. त्यामुळे जे चांगले आहे, त्याचे कौतुक करायला पाहिजे. शासन दिव्यांगांच्या पाठीशी आहे. त्यांना काहीच कमू पडू देणार नाही.
प्रदीपदादा गारटकर म्हणाले, स्पर्धेच्या सतरा दिवसांपूर्वी आम्हाला संयोजनाचा मान मिळाला. करोनानंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असल्याने आम्ही नव्या जोषाने तयार झालो. आमच्यावर दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू शकलो. आम्हाला दिलेला पाठिंबा असाच कायम ठेवावा. दिव्यांगाची स्पर्धा घेणे सोपे नसते. ही तारेवरची कसरत आम्ही सर्वांच्या सहकार्याने करू शकलो.
नागपुरला सर्वसाधारण विजेतेपद; पुणे उपविजेता
या स्पर्धेत नागपूर विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. नागपूरने कर्णबधिर, मूकबधिर, अस्थिव्यंग या प्रवर्गात बाजी मारली. त्यांना जेतेपदाच्या चषकाने गौरविण्यात आले. या वेळी पुणे संघ उपविजेता ठरला. बहुविकलांग प्रवर्गात लातूर जिल्हा उपविजेता ठरला. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून २२१५ मूकबधिर, मतिमंद, आष्टी व्यंग, अंध विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
