समाजभवन व संतगुरु सेवालाल महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
तळेगाव दाभाडे : बंजारा समाजाचा मोठा वर्ग मावळ तालुक्यात राहत असूनही, समाजासाठी आतापर्यंत एकही समाजभवन नसल्याची खंत व्यक्त करीत, बंजारा समाजातील नागरिकांच्यावतीने समाजभवन व संतगुरु सेवालाल महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने संतगुरु सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. यावेळी विविध ठरावही करण्यात आले.
वेगवेगळ्या भागांत राहात असलेला हा समाज आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहे. समाजाचे सांस्कृतिक वैभव टिकून राहावे, विविध उपक्रमांसाठी हक्काची जागा मिळावी, यासाठी समाजभवनसाठी जागा मिळावी. तसेच संपूर्ण भारतात बंजारा समाजाची समान बोली, भाषा एक, पेहराव एक, आराध्य दैवतही एक तरीही वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात समाज का मोडतो ? त्यामुळे सर्व बंजारा समाजाचा सरसकट एसटी प्रवर्गात समावेश करावा. संत सेवालाल महाराजांची जयंती सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात बंजारा सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक हिरा जाधव, अध्यक्ष महादेव राठोड, बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष देविदास राठोड, बंजारा क्रांती दलचे पुणे अध्यक्ष अर्जुन आढे, जिल्हा परिषद विजापूरचे सदस्य रामभाऊ राठोड, संत सेवालाल महाराजांची भूमिका केलेले कलाकार आशुतोष राठोड, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन मराठे, अमोल शेटे, संतोष भेगडे, उद्योजक कल्पेश भगत, सुरेश कडू, संदीप लोहार, विनायक जगताप, उद्योजक शंकर खेतावत, सोमाटणेचे माजी सरपंच राजेश मुऱ्हे, चंदू राठोड, देसू राठोड, शंकर पवार, विजू राठोड, जयराम चव्हाण, राजू पवार, विठ्ठल राठोड, नितीन चव्हाण, नवनाथ राठोड, प्रतापशेट्टी चव्हाण, रामबन्सी जाधव, देवा चव्हाण, संतोष चव्हाण, प्रेम चव्हाण, मारुती चव्हाण, कृष्णा पवार, शिरसू राठोड, साहेबराव जाधव, सोपान राठोड आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन जतीन पांडे यांनी, तर आभार हिरा जाधव यांनी मानले.
