नादमुद्रा संगीत संमेलनात रसिक स्वरानंदात चिंब
पुणे : आश्वासक युवा कलाकारांच्या सादरीकरणाने ‘नादमुद्रा‘ संगीत संमेलनास आज सायंकाळी सुरुवात झाली. संमेलनाच्या पहिल्या सत्रात डॉ. शंतनु गोखले यांचे सुरेल संतूरवादन तर दुसऱ्या सत्रात विदुषी मंजुषा पाटील यांचे बहारदार गायन झाले.
अल्फा इव्हेंटस् तर्फे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताला समर्पित दोन दिवसीय संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीताकडे युवा पिढी आकर्षित व्हावी, त्यांना स्वरमंच उपलब्ध व्हावा तसेच नव्या आणि जुन्या पिढीतील उत्तमोत्तम कलाकारांचे गायन–वादन ऐकण्याची संधी मिळावी या उद्देशाने यंदाच्या वर्षीपासून संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका पंडिता मीरा पणशीकर, पंडित रघुनंदन पणशीकर, प्रसिद्ध कवी अशोक नायगांवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
जगप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनु गोखले यांनी त्यांच्या गुरूंचा आवडता राग मधुवंतीने मैफलीची सुरुवात केली. आलाप, जोड–झाला, स्वरांची बढत ही त्यांच्या वादनाची वैशिष्ट्ये ठरली. त्यानंतर विलंबित झपतालातील, द्रुत तीनतालातील दोन रचना सादर करून त्यांनी रसिकांना स्वरानंदात चिंब केले. खमाजमधील ठुमरीच्या अंगाने जाणारी धुन सादर करून मैफलीची सांगता केली. महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहराची सुरुवात आणि गुरूंच्या आवडत्या रागाचे सादरीकरण आनंद देऊन गेले, अशी भावना डॉ. शंतनु गोखले यांनी रसिकांशी संवाद साधताना व्यक्त केली. त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी यांनी समर्पक साथ केली.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात विदुषी मंजुषा पाटील यांनी राग पुरियातील विलंबित एकताल आणि तीनतालातील प्यारे रे गर लागे ही रचना सादर करून त्यांच्या आवजातील लगाव, सहज फिरत, दमदार ताना यांची झलक दाखवून रसिकांची मने जिंकली. शास्त्रीय संगीतासह ठुमरी, नाट्यसंगीत अशा विविध गायन प्रकारांवर हुकुमत असलेल्या स्वविचाराने प्रगल्भ गायकी दर्शविणाऱ्या विदुषी मंजुषा पाटील यांनी द्रुत तीनतालातील झनन पग पायल बाजे ही पारंपरिक रचना ऐकवून बिहागमधील लट उलझी सुलझा या रचनेने मैफलीची सांगता केली.
प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अनुष्का साने, रसिका वैशंपायन, तनिष्क (तानपुरा आणि सहगायन) यांनी साथसंगत केली.
कलाकारांचे सत्कार अल्फा इव्हेंटस्चे प्रमुख संचालक निखिल जोशी आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पंडिता मीरा पणशीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले.
