fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

संपूर्ण देशात सहकाराचा प्रसार करण्यात महाराष्ट्राचे खूप मोठे योगदान- अमित शहा

पुणे : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये दोन दिवसीय सहकार संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना सहकार मंत्री म्हणाले की केंद्रातील नरेंद्र मोदीजींचे सरकार सहकार क्षेत्रातल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आज देशात सहकार क्षेत्रामध्ये काही ठराविक राज्यं चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात सहकार अतिशय जुना आहे कारण सहकार हा महाराष्ट्राचा स्थायीभाव राहिलेला आहे आणि संपूर्ण देशात सहकाराचा प्रसार करण्यामध्ये या राज्याने खूप मोठं योगदान दिलं आहे असं त्यांनी सांगितलं.

सहकार क्षेत्रातल्या सर्व प्रश्नांवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका स्वतंत्र्य  सहकार मंत्रालयाची स्थापना केली, असं ते म्हणाले.  सहकारी पतसंस्थांचे एक अतिशय मोठे जाळे आपल्या देशात आहे आणि या जाळ्याने देशातल्या तळागाळातल्या घटकांना आर्थिक विकासासाठी बळ दिले आहे, असे त्यांनी अधोरेखित केलं.  येणाऱ्या दशकात सहकार क्षेत्र सर्वात जास्त प्रासंगिक क्षेत्र असेल असं त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र खूप मोठे, मजबूत आणि व्यापक आहे असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी सांगितलं. देशातील सुमारे साडेआठ लाख सहकारी संस्थांपैकी एकट्या महाराष्ट्रातच दोन लाख सहकारी संस्था म्हणजेच 67% सहकारी संस्था आहेत. पशुधन संस्था 35 टक्के, साखर सहकारी संस्था 27%, पणन संस्था 16%,  मत्स्य उद्योग संस्था चौदा टक्के आणि अन्नप्रक्रियेच्या 11% समित्या महाराष्ट्रात आहेत. याशिवाय महाराष्ट्रा 21% प्राथमिक कृषी पत संस्था(पॅक्स) आहेत आणि एकूण शहरी बँकांच्या 32 टक्के म्हणजे 490 बँका महाराष्ट्रात आहेत. याबरोबरच 6529 बँक शाखा देखील आहेत,  ज्या देशातील एकूण शाखांच्या 60% आहेत. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रात सहकार ही खूप मोठी ताकद आहे.  महाराष्ट्रात अर्बन को-ऑपरेटिव बँकांच्या माध्यमातून सुमारे 3.25 लाख कोटी रुपये जमा आहेत. जे देशाच्या एकूण अर्बन बँकांच्या ठेवीच्या 62% आहेत.

केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की जोपर्यंत देशात मूलभूत प्राथमिक संस्था बळकट होत नाहीत तोपर्यंत सहकार बळकट होणार नाही. यासाठी देशातील 63 हजार पॅक्सना बळकट करण्यासाठी त्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सहकार क्षेत्राला आपल्या कामगिरी बाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि आपल्या विश्वासार्हतेमध्ये वाढ करायला हवी असे ते म्हणाले. आत्मपरीक्षणामुळे सहकारी क्षेत्राला आपल्या व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्याची आणि आपली जबाबदारी स्वीकारण्याची देखील गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. आता सहकार क्षेत्रासोबत कोणताही अन्याय होऊ शकणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय बनवून सहकारातून समृद्धीचा जो मंत्र दिला आहे त्यामुळे सहकार क्षेत्राची वृद्धी कोणीही थांबू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading