कसबेकरांना व्याजासहीत भरभरून देणार — विरोधी पक्षनेते अजित पवार
पुणे:कसब्यामधील प्रश्न सोडवण्यासाठी व्याजासहित कसबेकरांना भरभरून दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यामध्ये बोलताना दिली.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ येथील नातूबाग मैदानात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आमदार संग्राम थोपटे, चेतन तुपे, सुनील टिंगरे,माजी राज्यमंत्री रमेश बागवे,माजी आमदार उल्हास दादा पवार, मोहन जोशी. दीप्ती चौधरी, जयदेव गायकवाड, उल्हास काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे,आदी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.
आपल्या भाषणात, अजित पवार यांनी. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन पदवीधर व शिक्षक मतदार संघामध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाचा दाखला देत राज्याचे वारे बदलले असल्याचे म्हटले. म्हणूनच जाणीवपूर्वक पुणे जिल्ह्यातील या दोन्ही पोट निवडणुका सहानुभूतीच्या नावाखाली बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न होता.
महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा गनिमा कावा ओळखून एकत्र येत आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या तिकिटाचं कसं होईल ? याची कुठल्याही प्रकारची चिंता न करता एक दिलाने कसबा हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोर लावावा, आपला विजय निश्चित आहे.मागील निवडणुकीचा संदर्भ देऊन मागे काय झाले हे न पाहता ही नवी पहाट आहे, नवीन सुरुवात आहे असे समजून कामाला लागा. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाचा निकालाने येथे काहीही घडू शकते, पुन्हा परिवर्तन होऊ शकते याची कार्यकर्त्यांनी आठवण ठेवावी असे अजितदादांनी म्हटले.
तर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या भाषणात, स्वातंत्र्यसंग्राम काळात इंग्रजांची सत्ता उलथून लावण्यासाठी याच कसब्यातून क्रांतिकारक व महापुरुषांची बीजे रोवली गेली असल्याचा उल्लेख करत आता याचप्रमाणे भाजपाची हकालपट्टी करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले. देशातील व राज्यातील परिस्थितीचा संदर्भ देत पटोले यांनी,घमेंडी केंद्र सरकारने देशातील तरुणाईंला बेरोजगारीला व व्यापाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. या प्रवृत्तींना मूळासहीत उखडून काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची पायाभरणी असेल व ती देशासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे नमूद केले.
याप्रसंगी महाविकास आघाडीतील पुणे शहरांमधील विविध वक्त्यांची भाषणे झाली. त्यामध्ये आप्पासाहेब थोरात, लक्ष्मी आंदेकर, दीपक मानकर, रामभाऊ पारीख, बाबासाहेब धाबेकर आदींचा समावेश होता.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश बागवे यांनी तर प्रशांत जगताप यांनी आभार मानले.अपक्ष उमेदवार किसन जाफरी यांनी आपला पाठिंबा श्री धंगेकर यांना जाहीर केला.
