Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आदित्य ठाकरे आणि प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यांबाबत दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे डॉ. नीलम गोर्‍हे यांचे गृह सचिवांना निर्देश

मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान दिनांक ७ फेब्रुवारी, २०२३ रोजी बीडकीन परिसरात त्यांच्या सभास्थानी दगडफेक झाल्याची आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी घडली आहे. या दोन्ही घटनांची विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोर्‍हे यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत त्यांनी माहीती घेतली आहे. त्याचसोबत या विषयावर दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत आज गृह विभागाला निवेदनाद्वारे निर्देश दिले आहेत. याबाबत त्यांनी आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांना निवेदन दिले आहे. आ. श्री आदित्यजी ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. मंगळवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी ते औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावात त्यांची सभा होती. दरम्यान, त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना घडली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. श्री. आदित्य ठाकरे महालगावात पोहोचल्यावर सभा सुरू होण्याच्या दरम्यान दुसरी मिरवणूक सुरु झाली होती. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना डीजे सुरू होता. त्याचा आवाज कमी करायला लावल्याने वाद झाला. सभेमध्ये शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञात व्यक्तीने स्टेजवर दगड भिरकावला. त्यानंतर सभा संपल्यावर पुन्हा एकदा आदित्यजींचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे. याबाबत डॉ. गोर्‍हे यांनी स्थानिकांशी बोलून माहिती घेतली असता मोजकेच पोलिस यावेळी सभास्थानी उपस्थित होते. याचबरोबर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे एका व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. या व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव त्यांना पाठीत थापड मारून त्यांच्या सुरक्षारक्षकाला देखील ढकलून दिल्याचं प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आमदार प्रज्ञा सातव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महेंद्र डोंगरदिवे याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र राज्यात घडलेल्या या दोन्हीही घटना अतिशय गंभीर आहेत. या दोन्ही घटनांचा आपल्या स्तरावरून सखोल तपास होण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे हल्ल्यांना सामोरे जावे लागणे हे नक्कीच बरोबर नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुढील निर्देश दिले आहेत :

१. या दोन्ही घटनांमध्ये आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी योग्य त्या कलमंचा वापर करावा.

२. हे दोन्हीही हल्ले पूर्वनियोजित असल्याचे दिसत असल्याने यामागील खरे सूत्रधार कोण आहे, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरून पोलिस यंत्रणेला आपण सूचित करावे.

३. आ. प्रज्ञा सातव यांच्या हल्ल्याबाबत ज्यांनी कोणी बेजबाबदार वक्तव्य केले आहे, त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी. आवश्यक असेल तर भारतीय दंडसंहिता कलम १२० ब लावण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.

४. आ. श्री. आदित्यजी ठाकरे आणि आ. प्रज्ञा सातव यांना पुरेशी सुरक्षा पोलिसांकडून देण्याबाबत आपल्या स्तरावरून तातडीने निर्णय घेण्यात यावा.

५. भविष्यात लोक प्रतिंनिधींना आशा अप्रिय घटनांना सामोरे जावे लागणार नाही यासाठी पोलिसांना अधिक सक्षमपणे संरक्षण देण्यासाठी आपल्या स्तरावरून विशेष मार्गदर्शन करण्यात यावे. गृह विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन अशा घटनांवर आळा बसण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित झाली असल्याचे सांगून याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात येतील अशी अपेक्षा त्यांनी आज  लिमये यांच्याशी आज दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading