‘दूसरी मॉं’ने पूर्ण केले १०० एपिसोड्स!
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’साठी सेलिब्रेशनची वेळ आहे, कारण मालिकेने १०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू झालेली ही मालिका उत्तर प्रदेशमध्ये पती, दोन मुली व सासरच्या माणसांसोबत राहणाऱ्या एका महिलेच्या कथेला सादर करते. ती व तिचा पती नकळतपणे त्याच्या अवैध मुलाला दत्तक घेतात, ज्यानंतर त्यांचे आनंदी, उत्साही कौटुंबिक जीवन ठप्प होऊन जाते. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची टेलिव्हिजनवरील आवडती कौटुंबिक मालिका बनली आहे.
मालिकेचे स्टार कलाकार नेहा जोशी (यशोदा), आयुध भानुशाली (कृष्णा) आणि मोहित डागा (अशोक) यांनी १०० एपिसोड्सचा टप्पा गाठण्याबाबत त्यांचा उत्साह व्यक्त केला. यशोदाची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या, ‘‘आमच्या मालिकेने १०० एपिसोड्सचा टप्पा गाठला आहे यावर माझा विश्वास बसत नाही. मालिका ‘दूसरी मॉं’सह माझा प्रवास खास राहिला आहे. मला ही संधी मिळाली तेव्हा मी नर्व्हस व तितकीच उत्साहित होते. माझा विवाह झाला त्याच आठवड्यात मला मालिकेसाठी जयपूरला जावे लागणार होते. पण मी माझ्या पतीचा पाठिंबा आणि मालिकेचे दिग्दर्शक इम्तियाज पंजाबी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे यशोदा भूमिका साकारण्याचे ठरवले. या यशासह मला वाटते की, मी योग्य निर्णय घेतला. माझे सह-कलाकार आणि मालिकेसााठी मेहनत घेत असलेल्या टीमच्या पाठिंब्याशिवाय हे यश मिळणे शक्य नव्हते. त्यांनी सर्वकाही सुरळीत केले. या मालिकेने मला कलाकार म्हणून अनेक भावना अनुभवण्याच्या अनेक संधी दिल्या आहेत. आम्ही इथवर पोहोचण्याचा मला आनंद होत आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. हे यश आम्हाला प्रेक्षकांचे अधिक मनोरंजन करत राहण्यास प्रेरित करते.’’
कृष्णाची भूमिका साकारणारा आयुध भानुशाली म्हणाला, ‘‘असा सुवर्ण टप्पा गाठणे टीम एफर्ट आहे आणि मला अशा अद्भुत मालिकेचा भाग असण्याचा आनंद होत आहे. १०० एपिसोड्सचा टप्पा गाठण्यासाठी मालिका ‘दूसरी मॉं’चे सर्व कलाकार व टीमचे अभिनंदन. आम्हा सर्वांसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. आम्ही शूटिंगसाठी जयपूरला येण्यासोबत एकत्र अधिक वेळ व्यतित केला असल्यामुळे आमच्यामध्ये दृढ नाते तयार झाले आहे. आणि प्रत्येक सरत्या दिवसासह आमचे नाते अधिक प्रबळ होत आहे. आम्ही सेटवर केक कापत आणि अनेक फोटो काढत या यशाला साजरे केले. मी प्रेक्षक व चॅनेलचे त्यांनी सतत दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानतो.’’
अशोकची भूमिका साकारणारे मोहित डागा म्हणाले, ‘‘मला १०० एपिसोड्सचा टप्पा गाठण्याचा आनंद होण्यासोबत धन्य वाटते. मी अथक मेहनत घेणाऱ्या आणि या मालिकेला यशस्वी करणाऱ्या टीमचे जितके आभार मानेन ते कमीच आहे. मालिकेमधून मला मिळालेली बहुमूल्य गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचे प्रेम. अशोकची भूमिका साकारण्याचा अनुभव संपन्न राहिला आहे आणि या भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. आम्ही नवीन बेंचमार्क्स स्थापित करण्याचा आमचा प्रयत्न सुरूच ठेवू आणि आगामी दिवसांमध्ये अधिक उत्तम यश संपादित करू.’’
