fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsPUNE

निसर्गशाळेत जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांची अनोखी अभ्यास सहल

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चा उपक्रम ; ज्येष्ठ बालसाहित्यिक ल.म.कडू यांची उपस्थिती

पुणे : निसर्ग ही फार मोठी शाळा आहे. चार भिंतींच्या आता मिळणा-या शिक्षणापेक्षा ख-या अर्थाने शिक्षण देणा-या निसर्गशाळेत जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांची अभ्यास सहल काढण्यात आली. विविध वृक्ष, वनस्पती, प्राणी, पक्षी यांची माहिती घेण्यासोबतच शेतामधील पेरणी, नांगरणीचा देखील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या ‘अभ्यास सहल’ या उपक्रमाचे. पानशेतजवळ असलेल्या विद्याविहार या पर्यावरण प्रकल्पास सुमारे २०० विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी ज्येष्ठ बालसाहित्यिक, विद्याविहार निसर्ग शाळेचे संचालक व गमभन संस्थेचे ल.म.कडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटताना विद्यार्थ्यांना विविध वृक्ष, वनस्पतींची ओळख झाली. यावेळी ल.म.कडू यांनी विद्यार्थ्यांना गप्पी मासे, खेकडा, नक्षत्रवृक्ष, गांडूळखत आणि विविध वृक्षांची माहिती सोप्या भाषेत करून दिली. विद्यार्थ्यांनी नांगरणीचा देखील प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच बटाटे लागवड केली. बीजगोळे का तयार केले जातात, याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, जय गणेश ज्ञानवर्धन अभियानंतर्गत पालकत्व योजनेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांना घेतले जाते. शिक्षणाशी संबंधित सर्वोतोपरी मदत त्यांना दिली जाते. मात्र, ट्रस्ट केवळ शिक्षण देण्यासाठी सहाय्य करण्यापुरते मर्यादित कार्य करीत नसून अभ्यास सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. वर्षभर अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: