fbpx

संभाजी ब्रिगेडची ‘ही’ बदलती भूमिका महत्त्वाची – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे : आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे तरुणांना उद्योगधंदे व व्यापार क्षेत्रात काम करून स्वतःचा विकास करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडने प्रयत्न सुरू केले आहेत. संभाजी ब्रिगेडची ही बदलती भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजित रौप्यमहोत्सवी महाधिवेधशानाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. उदघाटनाच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, ‘तंजावर’चे युवराज संभाजी राजे भोसले, चित्रपट अभिनेते भरत जाधव, अशोक समर्थ, लेखक अरविंद जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी चव्हाण यांच्या हस्ते भरत जाधव यांना ‘विश्व जागतिक जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तर अशोक समर्थ यांचाही सन्मान करण्यात आला.

चव्हाण म्हणाले, आपण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा माझ्यापुढे आला. शेतकरी अल्पभूधारक व नोकरदार मंडळीना डोळ्यासमोर ठेवून आरक्षण देण्याचा कायदा केला.  या आरक्षणाला काही जणांनी विरोध केला मागासवर्गीय आयोगाने ही आरक्षण देण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका घेतली त्यानंतर राने समिती नेमली परंतु दुर्दैवाने सरकार बदललं त्यांनंतर आरक्षण ही रद्द झाले व शेवटी पुन्हा वकीलांची टीम नेमून आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण त्याला किती वेळ लागतो हे सांगणे अवघड आहे.

ते पुढे म्हणाले की, संभाजी ब्रिगेड ही 25 वर्षे विविध विषय हाती घेऊन कार्य करीत आहे. पण आता संभाजी ब्रिगेड वेगळ्या दिशेने पाऊल उचलले अर्थकारण आणि सर्वागीण विकास ही भूमिका घेऊन तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानमूळे वेगवेगळ्या क्षेत्रात बदल होत आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी कमी होण्याची भीती वाटत आहे त्यासाठी तरुणांनी स्वतः धडपड करून विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

श्रीनिवास पाटील म्हणाले की, संभाजी ब्रिगेडमध्ये तरुणांच्या विकासासाठी सुरू केलेले प्रयत्न स्वागतार्ह आहेत.

प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले यांनी प्रास्ताविक केले हर्षवर्धन मगदूम यांनी उपस्थितांचे आभार मानले यशवंत गोसावी यांनी सूत्रसंचालन केले

Leave a Reply

%d bloggers like this: