नव वर्षांच्या सुरवातीला पुण्यात रंगणार भारत आणि श्रीलंका आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना येत्या गुरूवारी दि. ५ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. तब्बल २२ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर २०२३ या नवीन वर्षात क्रिडा रसिकांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची मेजवानी मिळणार आहे.
२०२३ या नवीन वर्षात भारतीय संघाच्या श्रीलंका संघाविरूध्दच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये आयोजित होणार आहे. याआधी पुण्यामध्ये मार्च २०२१ मध्ये भारतीय संघाचे इंग्लंड संघाविरूध्द ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षात भारतीय क्रिकेट संघाचा घरचा आंतरराष्ट्रीय मौसम ३ जानेवारी २०२३ पासून सुरू होत असून यामध्ये श्रीलंका संघाविरूध्द ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांचे आयोजन केले गेले आहे. सध्या भारतीय संघ बांग्लादेश विरूध्द कसोटी सामने खेळत असून २६ डिसेंबर २०२२ रोजी या दौर्याचा समारोप होणार आहे.
भारतीय संघ ३ जानेवारी २०२३ रोजी श्रीलंका संघाविरूध्द पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळणार असून त्यानंतर ते पुण्यामध्ये दुसरा सामना खेळण्यास येणार आहेत. हा दिवस-रात्र सामना असणार आहे.
तिकीट विक्री मंगळवार पासून
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्याच्या अधिकृत तिकीट विक्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आजपासून (मंगळवार, २७ डिसेंबर २०२२) सकाळी १०: वाजता प्रारंभ करणार आहे. www.bookmyshow.com या संकेतस्थळावर ही तिकीटे ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. तसेच सामन्याची प्रत्यक्ष (बॉक्स ऑफिस) तिकीटविक्री पीवायसी हिंदू जिमखाना, भांडारकर रोड आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे होणार आहे. या दोन्ही ठिकाणांवरील बॉक्स ऑफिस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत खुले असणार आहेत.
तिकीट विक्रीचे दर असेः ईस्ट स्टँड आणि वेस्ट स्टँडः रूपये ८००/-; साऊथ अप्परः रू.११००; साऊथ लोअरः रू. २०००/-; साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टँडः रू.१७५०/-; नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँडः रू.१७५०/-; नॉर्थ स्टँडः रू. २०००/-; साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टँडः रू. ३५००/-; कॉर्पोरेट बॉक्सचे (१२ व्यक्तींची आसनक्षमता) तिकीट रू. ६,००,०००/-