Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

कीर्तन कलेद्वारे देव-देशभक्ती पोहोचली हृदयापर्यंत – हभप चारुदत्त आफळे

पुणे : कीर्तन कलेविषयी समाजात अजूनही अनभिज्ञता आहे, मात्र कीर्तन कलेत चित्र, शिल्प, नृत्य, नाट्यादी कलांचा संगम असून समाजाच्या हृदयापर्यंत देवभक्ती, देशभक्ती पोहोचविणे कीर्तन कलेने सफल करून दाखविले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार आणि नाट्य कलावंत हभप चारुदत्त आफळे यांनी केले.
नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सहजीवन व्याख्यानमालेत आज आफळे यांचे ‘महाराष्ट्राची कला परंपरा’ या विषयावर व्याख्यान झाले. त्याप्रसंगी त्यांनी शिल्प, चित्र, नाट्य, संगीत आणि कीर्तन या विषयांची गुंफण करून ललित कलांची महती विशद केली. आजच्या सत्राचे उद्घाटन खासदार गजानन कीर्तीकर यांनी दीप प्रज्वलीत करून केले. विदिशा कीर्तीकर, व्याख्यानमालेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष विनय कुलकर्णी व्यासपीठावर होते.
एखाद्या गोष्टीला कला म्हणावे की तंत्र असा संभ्रम असताना ज्याच्यात चूक दुरुस्त करता येते ती ललित कला तर ज्यात चूक दुरुस्त करता येत नाही त्याला तंत्र म्हणावे असे सांगून आफळे म्हणाले, महाराष्ट्रातील संतांच्या मांदियाळीने व्यक्त होताना ललित कलांचा खुबीने वापर केला आहे. ज्यात शिल्पकला, चित्रकला, नाट्य, नृत्य अशा विविध ललित कलांचा सहज संगम केल्याचे आढळून येते. व्यक्तीपेक्षा कृतीच्या कीर्तीचे जतन व्हावे म्हणून शिल्पकारांनी अनाम राहणे योग्य समजले असे त्यांनी शिल्पकलेविषयी बोलताना सांगितले.
लोककला ही चित्रपटांची जननी असून नाट्य-चित्रपट क्षेत्रात महाराष्ट्राचा अग्रक्रम आहे. महाराष्ट्रानेच चित्रपट सृष्टी अधिकाधिक सांभाळली आहे. महाराष्ट्राइतकी विकसित रंगभूमी जगात कुठेही पाहिली नाही, असे श्रेष्ठ कलावंतांनी मान्य केले आहे. संगीतनाट्य परंपरेतही विलक्षण जादू आहे. नृत्य या कलेविषयी बोलताना आफळे म्हणाले, महाराष्ट्रात शेतकरीनृत्य ते कोळीनृत्य तसेच देवीच्या गोंधळापासून वारीतील पाउल नृत्याचा समावेश आहे. ललित कलांविषयी पुन्हा नव्याने सजगता निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील प्रतिभावान साहित्यिकांचे स्मृतीगान शाळा-शाळांमधून पहिल्या तासाला व्हावे, महाराष्ट्रातील नाट्यश्रीमंती जपायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील नाट्यकलेची श्रीमंती विशद करताना आफळे म्हणाले, ‘कट्यार काळजात घुसली’सारख्या कलाकृतीची हिंदी आवृत्ती जगावर राज्य करेल. नृत्यकलेची महती सांगताना, नृत्य हा एक प्रकारचा उपचार आहे. चांगल्या गीतावर चांगले नृत्य करणे हा मानसिक ताणतणातून बाहेर येण्यासाठी युवा पिढीलाच नाही तर प्रत्येकालाच उपयुक्त असा उपचार आहे. यासाठीच वारी, गोंधळ परंपरेमध्ये नुसते चालणे-गाणे या व्यतिरिक्त नृत्यावरही भर दिला आहे. आपल्यातील मीत्वाला बाहेर काढण्याची ताकद नृत्यामध्ये आहे.
स्वत:च्या भाषेचा विसर हा आजार फक्त मराठी भाषेला
मातृभाषेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल व्यक्त होताना आफळे म्हणाले, स्वत:च्या भाषेचा विसर हा आजार फक्त मराठी भाषेला जडला आहे. इतर प्रांतातील व्यक्ती भेटल्यानंतर ते त्यांच्या मातृभाषेतच संवाद साधतात परंतु मराठी माणूस भेटल्यानंतर इंग्रजी भाषेत व्यक्त होतो. इंग्रजी भाषा आवश्यक आहेच परंतु माय मरो आणि मावशी उरो अशी अवस्था मराठी भाषेची होऊ नये यासाठी, मराठी भाषेचा सन्मान जपण्यासाठी घराघरांत मराठीचे वाचन, संभाषण झाले पाहिजे. मराठी कला, संस्कृती, धर्म याचे संगोपन होणे अत्यावश्यक आहे.
सुरुवातीस विनय कुलकर्णी, जाई जोशी स्वागत केले. सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading