fbpx

हिवाळी अधिवेशन देते महिलांना रोजगाराची संधी

सध्या नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानभवन, परिसरात महिला बचतगटांना उपहारगृह चालविण्यास अनुमती देण्यात आली आहे. विधानसभा परिसरात ज्यूस, उपाहार, जेवणाचे असे  एकूण आठ स्टॉल विविध महिला बचत गटांकडून लावण्यात आले

यंदाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत विधिमंडळ सदस्य व अधिकारी/कर्मचारी यांना विधान भवन परिसरात खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे याकरिता  (१) बहुजन महिला स्वयंसहायक बचत गट (२) आधार महिला बचत गट, (३) सभ्य महिला बचत गट, (४) तथागत महिला बचत गट, (५) सक्षम महिला बचत गट (६) साक्षी महिला बचत गट (७) सोनाली महिला बचत गट (8) गजानन महिला बचत गट यांना  खाद्यपदार्थ पुरविण्यास मा. पीठासीन अधिकारी यांनी अनुमती दिली आहे

सोनाली महिला बचत गट ,नागपूर या बचतगटाच्या भारती वानखेडे यांच्याशी चर्चा करताना त्या म्हणाल्या, आमचा बचतगट गेल्या 15 वर्षांपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात स्टॉल लावत आहे. शासनाकडून आम्हाला स्टॉल, खुर्च्या, टेबल, पाणी आणि लाईट मोफत देण्यात आले आहे. आमच्याकडील शेंगदाणे आणि तिळाचे लाडू अतिशय प्रसिद्ध आहेत. नेहमी अधिवेशनासाठी येणारे अधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्ते आवर्जून लाडू खाण्यासाठी येतात. आमदार रोहित पवार यांनी आमच्या सोनाली महिला बचत गटाच्या जेवणाविषयी ट्विट करून कौतुक केल्याने आमचा उत्साह वाढला आहे.

बहुजन महिला बचत गटाच्या वंदना लांजेवार यांनी सांगितले. विधानभवन परिसरात  शासनाकडून देण्यात आलेल्या या स्टॉलमुळे आमच्या गटातील महिलांना काही दिवस तरी रोजगार उपलब्ध झाला आहे. सर्व मोफत सेवा देण्यात आली असल्याने आम्ही बचत गटाच्या माध्यमातून लागणारे साहित्य आणून गरम जेवण तयार करून देतो. हिवाळी अधिवेशनात आम्हाला स्टॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करते. नवीन बचतगटांना स्टॉल देताना बचतगटांना मेनू ठरवून दिल्यास सर्वांचा व्यवसाय चांगला होवू शकेल, अशी सूचना त्यांनी केली.

सभ्य महिला बचत गटाच्या ममता गेडाम यांनी सांगितले, आमच्या बचतगटांच्या महिलांना अधिवेशन काळात  रोजगार उपलब्ध झाला आहे. आम्ही तयार केलेल्या विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा ग्राहक आनंदाने आस्वाद घेतात, याचा आम्हा महिलांना आनंद वाटतो.

Leave a Reply

%d bloggers like this: