Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

तरुणाईची घुसमट होण्यास सामाजिक, आर्थिक अन्‌‍ राजकीयबाबी कारणीभूत – केतकी जोशी

पुणे : आजच्या काळातील तरुणाई सजग, सक्षम आहे, निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी कसोशिने प्रयत्नरत आहे. तरुणाईवर समाजमाध्यमांचा प्रभाव निश्चितच आहे. काही अपवाद सोडल्यास समाजमाध्यमांचा तरुणाईकडून सरसकट गैरवापर होत आहे असे म्हणता येणार नाही, असे प्रतिपादन तरुणाईच्या प्रश्नांवरील युवा अभ्यासक केतकी जोशी यांनी केले. तरुणाईची घुसमट होण्यास सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बाबी जबाबदार असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

रंगत संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजची तरुणाई सक्षम की दिशाहिन’ या विषयावर जोशी यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जोशी बोलत होत्या. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

जोशी म्हणाल्या, छोट्या-छोट्या गावातून येऊन यशाचे शिखर गाठलेली तरुणाई दिसते. एखादी वाट निवडल्यानंतर त्यात यश येत नाही असे दिसल्यानंतर खचून न जाता वेगळी वाट शोधणारी मुले-मुली समाजात आहेत. आवडीच्या क्षेत्रात यश गाठण्यासाठी शहरी भागातील मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुलांना जास्त संघर्ष करावा लागतो. त्या पुढे म्हणाल्या पैसा, प्रसिद्धी म्हणजे यश असे काहीसे समीकरण झाले असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. अशा घटनांमध्ये पालकांनी मुलांशी संवाद साधून योग्य मार्ग दाखविला पाहिजे.

सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचे एक मोठे साधन आज आपल्या हाती आले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर होत असला तरी या माध्यमाला नाकारून चालणार नाही. सोशल मीडियाचा प्रभाव भविष्यात वाढतच जाणार आहे. सोशल मीडियाचा वापर करताना गैरप्रकार टाळण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार मात्र निश्चित करावा लागणार असल्याचे जोशी म्हणाल्या.

सुवासिनी फाउंडेशनने शैक्षणिक पालकत्व घेतलेल्या चार विद्यार्थ्यांना प्रज्ञा महाजन यांच्या हस्ते कौतुकपत्राचे वाटप करण्यात आले. सुरुवातीस भूषण कटककर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. परिचय वासंती वैद्य, मानपत्राचे वाचन निरुपमा महाजन यांनी तर सूत्रसंचालन चंचल काळे, मुक्ता भुजबले यांनी केले.
या प्रसंगी निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading