fbpx

सर्वधर्मीयांनी मानवतेवर निष्ठा ठेवावी – बिशप डॉ. थॉमस डाबरे

पुणे : येशू सगळ्यांसाठी आहे, त्यांचा संदेश सगळ्यांसाठी आहे. कोणाचीही कोणतीही विचार प्रणाली असो, ती ईश्वराची माणसे आहेत अशी भावना प्रत्येक माणसाप्रती ठेवायला पाहिजे. सर्वधर्मीयांनी मानवतेवर निष्ठा ठेवावी. मतभेद कितीही असले तरी ते दूर करून प्रेमाने राहायला पाहिजे. राष्ट्रनिष्ठा ही एका समाजापूर्ती मर्यादित नाही. राष्ट्रनिष्ठेचा वारसा सगळ्यांचा आहे, ती सर्वांनी मिळून जपली पाहिजे. असे मत पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ.थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले.
ख्रिसमस निमित्त डायोसिस ऑफ पुणे, स्वच्छंद पुणे आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने सर्वधर्मीय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, गांधीवादी विचारवंत अन्वर राजन, शिक्षणतज्ञ ए.पी. कुलकर्णी, रवींद्र धंगेकर, कायदेतज्ञ शिवराज कदम जहागिरदार,  माधव पुंडे, रवींद्र शाळू, मोहन जवळकर, राॅकी गोम्स आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र शाळू यांनी सर्वधर्म समभावाचा संदेश देणार गीते यावेळी सादर केली.
अन्वर राजन म्हणाले, करुणा आणि सेवा ही शिकवण ख्रिस्ती धर्माने दिली. उपेक्षितांना सेवा देण्याचे काम ख्रिस्ती बांधव करतात. सर्व धर्मानी प्रेम ही शिकवण जगाला दिली आहे. माझा धर्म श्रेष्ठ अशी भावना सध्या वाढत आहे. धर्माच्याबाबत प्रेम हीच भावना असली पाहिजे. मानवतेवर निष्ठा ठेवली तर धर्माच्या बाबतीत परिस्थिती बदलेल. धर्माच्या नावावर द्वेष पसरविणाऱ्यांना प्रेमाने उत्तर देऊ.
ए.पी. कुलकर्णी म्हणाले, भारतीय संस्कृती जगाला प्रेम देणारी आहे, या संस्कृतीने सर्व धर्माला सामावून घेतले आहे. सर्व धर्मातील लोकांचे भारताच्या उन्नतीमध्ये योगदान आहे. त्यामुळे कुठल्याही धर्मविरोधी गोष्टी करू नयेत. सर्वांनी बंधुभावाने रहा, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: