fbpx

स्वरनाद सांगीतिक कार्यक्रमात रसिकांनी अनुभवली तबला आणि गायनाची पर्वणी

पुणे : आशय कुलकर्णी यांचे दमदार तबलावादन तर ऋतुजा लाड यांच्या बहारदार गायनाने रंगलेली एक रम्य अशी सांगितिक संध्याकाळ पुणेकर रसिकांनी अनुभवली. निमित्त होते स्वरनाद या सांगीतिक कार्यक्रमाचे.

शास्त्रीय संगीतातील नव्या पिढीच्या कलागुणांना प्रोत्साहन व योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने स्वरझंकार म्युझिक अकादमी आणि अनहद नाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरनाद हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत हा दुसरा कार्यक्रम असून, पुढील वर्षभरात आणखी सहा संगीत मैफिलींचे आयोजन केले जाणार आहे.

नाताळच्या पूर्वसंध्येला कर्वेनगर येथील डी पी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला उदयोन्मुख तबलावादक व तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य असलेले आशय कुलकर्णी यांचे एकल तबलावादन
झाले. त्यांनी तीनतालमध्‍ये पेशकर, कायदा, रेला, तुकडे, गट, फर्माइशी चक्रधार यांचे दमदार सादरीकरण करत उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांना अभिनय रवंदे यांनी संवादिनीवर साथ दिली.

त्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांच्या शिष्या असलेल्या ऋतुजा लाड यांचे गायन झाले.

त्यांनी गौरी रागाने आपल्या गायनाची सुरवात केली. त्यामध्ये ‘आवे राजन आईया…’ ही विलंबित तीनताल बंदिश, ‘देवी दुर्गे…’ ही दृत एक तालातील बंदिश सादर केली. त्यानंतर राग केदारमध्ये ‘मालनिया सज चली…’ ही मध्यलय झपतालातील बंदिश, ‘नवेली नार…’ ही एकतालातील बंदिश व तीन तालात ‘कान्हा रे…’ ही बंदिश सादर केली. ‘गुरू पैया लाग्यो नाम…’ या भजनाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना लीलाधर चक्रदेव हे संवादिनीसाठी तर प्रणव गुरव यांनी तबल्यासाठी साथ दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: