fbpx

महाराष्ट्र द्रोह्यांचा आम्ही शेवट करणारच – उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र द्रोह्यांचा आम्ही शेवट करणारच. महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मुंबईचा – महाराष्ट्राचा लचका कसा तोडतायत ते पाहतो. मुंबईत विकणारी जागा नाही. ती आमची मायय. तिच्याशी खेळाल, तर आगडोंब उसळेल, असा इशारा शनिवारी निघालेल्या महाविकास आघाडीच्या महामोर्चात उद्धव ठाकरे यांनी दिला.

महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्न आदी विविध मागण्यांसाठी निघालेल्या महामोर्चात आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि इतर पक्ष आणि संघटना सहभागी झाले. त्यामुळे काही काळ मुंबईत वाहतूक कोंडीही झाली. मोर्चाचा शेवट शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, संजय राऊत यांच्या भाषणांनी झाला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कर्नाटक असो वा आणखी कोणी असोत, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत. या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकीय शेवट करणार. आजचा मोर्चा त्याची सुरुवात आहे. ज्यांनी-ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जगाने हे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. संयुक्त महाराष्ट्रासाठी असाच संघर्ष करावा लागला. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

ठाकरे पुढे म्हणाले की, महामोर्चासाठी सर्व पक्ष एकटवलेत. फक्त महाराष्ट्र द्रोही आणि बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन जाणारे तोतये या महामोर्चा नाहीत. राज्यपाल कोण असावा, केवळ केंद्रात बसतो म्हणून त्यांची सोय म्हणून पाठवून द्यायचे हे चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, फुले यांच्याबद्दल अवमानकारक बोलतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले नसते तर आज आपण कुठे असतो, त्याचे उदाहरण मंर्त्यांनी भीक शब्द उच्चारून दाखवून दिलाय. सावित्रीबाईंनी शेणमार सहन केला. ते डगमगले नाहीत. महिला शिकल्याच पाहिजेत. त्या शिकल्या नसत्या, आपण शाळेत गेलो नसतो, तर भीक मागत बसलो असतो, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

ठाकरे पुढे म्हणाले की, मिंदे सरकारमध्ये मुळात बौद्धिक दारिद्रय असलेले मंत्री सुप्रियाताई सुळेंबद्दल काय बोललो आपण पाहिलेच. हे आंदोलन त्यांच्याविरोधात आहे. या लफ्यग्यांना महाराष्ट्राबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. एक – दोन मंत्री झाले. तिसरे मुंबईचे पालकमंत्री. त्यांनी महाराजांची आग्रह्याहून सुटका झाली त्यांची तुलना चक्क खोकेवाल्यांसोबत केली. मात्र, आग्राहून सुटल्यानंतर शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. मात्र, स्वत:च्या आईच्या कुशीत वार करून सरकार स्थापन केले.

महामोर्चातल्या गर्दीने महाराष्ट्र द्वेष्ट्याचे डोळे उघडले पाहिजेत. मुंबईचा, महाराष्ट्राचा लचका कसा तोडतायत ते पाहतोच. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सत्तेत असताना अनेक प्रकल्प सुरू केले, पण ते दुस-या राज्यात पळवले जात आहेत. सध्याचे मुंबईचे पालकमंत्री स्केअर फूटमध्ये बोलतात. मात्र, मुंबईत विकणारी जागा नाही. ती आमची माय आहे. तिच्याशी खेळायचा प्रयत्न केला, तर आगडोंब उसळेल. यांना महाराष्ट्राची अस्मिता संपवून टाकायची आहे. मात्र, महाराष्ट्र द्रोह्यांना या मातीत गाढल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: