Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

तरुणांमध्ये निर्णयक्षमता असणे महत्वाचे आहे – माजी अतिरिक्त सचिव इंद्रजीत देशमुख यांचे मत

पुणे : नकारात्मकता कितीही असली तरी त्यावर मात करण्याचे मार्ग काढा. कितीही दबाव असला तरी स्थिर रहा. चंचलता निर्णयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. यशापर्यंत जाण्यासाठी आळस, भीती आणि स्वतःवर असलेल्या विश्वासाची कमतरता या तीन गोष्टींवर मात करणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये निर्णयक्षमता महत्वाची आहे ती असेल तर आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकता, असे मत ग्रामविकास विभागाचे माजी अतिरिक्त सचिव इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले.

रयत प्रबोधिनीच्या वतीने मुक्त संवाद आणि मुलाखत मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भवन नवी पेठ येथे करण्यात आले होते. यावेळी इंद्रजीत देशमुख यांनी उपस्थित भावी अधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. रयत प्रबोधिनीच्या वतीने संस्थेचे संचालक आणि कार्यकर्ते उमेश कुदळे यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या वेळी आवश्यक ती मानसिक तयारी करण्यासाठी लागणाऱ्या अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली.

अनेक विद्यार्थ्यांनी कायदा विषयाचा अभ्यास करण्याकरिता संस्थेकडे पूर्व नियोजित शुल्क जमा केले होते. पण परीक्षा पद्धती मध्ये झालेल्या बदलानुसार या कार्यक्रमात संस्थेने तब्बल 2 लाख रुपये विद्यार्थ्यांना परत करून ‘ बीन घामाचं धन नको रे देवा ‘ ही उक्ती साध्य केली आहे. ही कृती स्पर्धा परीक्षा विश्वात प्रथमच होताना दिसत आहे असे इंद्रजित देशमुख यांनी मत व्यक्त केले.

इंद्रजीत देशमुख म्हणाले, मन एकाग्र स्थिर शांत कसे ठेवायचे हे महत्वाचे आहे. आयुष्यातील सगळ्या प्रश्नाची उत्तरे मन शांत केल्याने मिळतात. अंतर्मनात आपण जे भरू त्याचेच प्रतिबिंब आपल्यात झळकत असते त्यामुळे अंतर्मनात सगळे विचार, जाणीवा सकारात्मक भरणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले, मी विजयी होणार असा विश्वास ठेवा. नकारात्मकता काढून टाकल्याशिवाय प्रभावीपणे स्वतःचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही. नकारात्मकतेवर काम करून विजय मिळवा असे सांगत त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीचे तंत्र तरुणांना सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading