नुपूर शर्मावर कारवाई होते, मग कोश्यारींवर का नाही – उदयनराजे भोसले
पुणे : महाराजांपुढे पक्ष दुय्यम आहे. पण सध्या काही तुटपुंजे, फुटकळ विकृत लोकं अनावश्यक विधाने करतात. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते. ज्याप्रमाणे नुपूर शर्माच्या बाबतीत डिसीप्लिनरी ऍक्शन घेण्यात आली तशीच कारवाई राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात का होत नाही, असा सडेतोड प्रश्न भाजपचे खासदार उयनराजे भोसले यांनी विचारात भाजपला घराचा आहेर दिला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आज (दि. 13) पुणे बंद पाळण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून हा बंद पाळण्यात येत आहे. मात्र, यामध्ये भाजपचे खासदार उदयराजे भोसले सहभागी झाले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, आज साडेतीनशे वर्षे होऊन लोकांमधील शिवाजी महाराजांबद्दलचा आदर कमी झालेला नाही. उलट तो वाढलाच आहे. महाराजांसाठी ज्याप्रमाणे पुण्यात बंद पाळण्यात येत आहे. तसेच वातावरण संपूर्ण राज्यात असायला हवे होते.
दरम्यान, डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता झाली.