Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

जम्मू काश्मीरच्या सर्व समस्यांचे उत्तर संविधानातच – खुर्शीद अहमद गनाई

पुणे : भारताला एक उत्तम संविधान लाभलेले आहे. जर संविधान उत्तम रितीने अंमलात आणले गेले तर भारत हा एक उत्तम देश बनेल, आपल्या समोर असलेल्या सर्व समस्यांचे उत्तर संविधानात आहे, असे मत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव, माजी माहिती आयुक्त आणि जम्मू काश्मीरच्या राज्यपालांचे माजी सल्लागार तथा माजी सनदी अधिकारी खुर्शीद अहमद गनाई यांनी पुण्यात व्यक्त केले.
सरहद , पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या स्व. माधव गोडबोले स्मृती व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारताचे माजी गृह सचिव स्व. माधव गोडबोले यांची चांगल्या प्रशासनाची कल्पना आणि माझे जम्मू काश्मीर सेवेतील अनुभव या विषयांवर खुर्शीद गनाई यांनी त्यांचे विचार सविस्तर मांडले.
ते पुढे म्हणाले, " उत्तम प्रशासन म्हणजे काय ? तर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, कार्यक्षम कर्मचारी, प्रशासनात असलेली पारदर्शकता या बरोबरच नागरिकांचा सक्रीय सहभाग यातून उत्तम प्रशासन उभे राहते. प्रशासनामध्ये नागरिक व अधिकारी यांची काय भूमिका असते हे स्पष्ट सांगितले आहे. उत्तम प्रशासन सर्वांना समाविष्ट करणारे असते, त्यामध्ये गरीब जनता, अल्पसंख्याक नागरिक यांचा देखील समावेश असतो. प्रशासन हे सर्वसमावेशक असावे. मेडिकल कौन्सिल, आरबीआय, युजीसी, सेबी यासारख्या अनेक महत्वाच्या संस्था प्रशासन अधिक मजूबत करतात. २०१९ पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत हे मान्य करावे लागेल. हे बदल मुख्यत: डिजिटलायझेशन आणि ई – गव्हनर्स यामुळे झाले आहेत तर बायोमेट्रिक अटेंडन्स मुळे कर्मचारी याची कार्यक्षमता वाढली आहे. १५० -२०० सेवा ऑनलाईन झाल्यामुळे काश्मीर खोर्यातील नागरिकांचे काम सोप्पे झाले आहे. प्रशासनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढला आहे. अनेक मोठे पूल बांधले जाते आहेत, उत्तम रस्ते निर्माण होत असल्यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ देखील कमी झाला आहे. जलजीवन मिशन, आयुष्यमान भारत या सारख्या योजनांचा लाभ जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठ्या प्रमाणात नवीन गुंतवणूक देखील होत आहे. अनेक व्यवसाय उभे राहत आहेत. मोठ्या प्रमाणत वीज निर्मिती होत आहे. असे अनेक सकारात्मक बदल होत असताना आपण जम्मू आणि काश्मीरमधील नैसर्गिक सौंदर्य देखील तसेच अबाधित राहिल यांची आपण काळजी घ्यायला हवी. कारण नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता हीच खरी काश्मीरची ओळख आहे. ” असे मत खुर्शीद गनाई यांनी मांडले.
प्रशासनात येणाऱ्या नवीन अधिकाऱ्याना माजी सनदी अधिकारी माधव गोडबोले एक दीपस्तंभ आहेत. तर उत्तम प्रशासन उभे करण्यासाठी नागरिक आणि सामाजिक संस्था यांनी आता एकत्र यायला हवं अशी भावना महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.

सरहदचे संस्थापक आणि अध्यक्ष संजय नहार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रसंगी माधव गोडबोले यांच्या पत्नी सुजाता गोडबोले आणि त्यांची मुलगी मीरा गोडबोले कृष्णमुर्ती, निवृत्त एअर मार्शल अधिकारी भूषण गोखले, युवराज शहा,अर्हम फौंडेशनचे शैलेश पगारिया आदी मान्यवर उपस्थित होते. उमेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले, अनुज नहार याने पाहुण्याचा परिचय करून दिला तर शैलेश वाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading