शांत पुण्याकरिता नो हॉर्न बार बार…
पुणे : एक, दोन, तीन, चार नो हॉर्न बार बार… हॉर्न नॉट ओके प्लीज…स्वच्छ पुणे, शांत पुणे पण कधी? आपण सर्वजण नो हॉकिंगची शिस्त लावू आधी… अशा घोषणा देत नो हॉंकिंग डे अर्थात नो हॉर्न डे एकाच वेळी विविध चौकांमध्ये राबविण्यात आला. टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत आणि पोलिसांसह सामान्यांनी सहभाग घेत पुणेकरांनो हॉर्न वाजवू नका, असे सांगण्यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले.
लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने नो हाँकीग डे अर्थात पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना राबविता जनजागृती आली. पुण्यातील विविध चौकांमध्ये एकाच वेळी नो हाँकींग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टिळक चौक (अलका टॉकीज चौक) श्री साई चावडी येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम झाला.
यावेळी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मौला सय्यद, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. मा.स. गोवळवलकर गुरुजी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मकरंद टिल्लू म्हणाले, वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे पुणेकरांना विविध त्रासांचा सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळून आपल्या कृतीने इतरांची वृत्ती बदलण्याचा आपण प्रयत्न करुया. शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात. पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी आणि या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी हा उपक्रम घेतला जातो.
देवेंद्र पाठक म्हणाले, बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिक मध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना ब-याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील विविध प्रमुख चौकांमध्ये व पेट्रोलपंपांवर एकाच वेळी जनजागृती करण्यात आली. तसेच पुण्यातल्या विविध आय टी कंपनी, हॉटेल्स, मॉल्स, पीएमपी बसेस, विविध सामाजिक संघटना, सोसायटी या सर्वांनाच उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पद्माकर पुंडे यांनी केले.