fbpx

विद्यापीठातील कौशल्य अभ्यासक्रमातून रोजगाराच्या संधी

पुणे: विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१४ साली कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली असून या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच मागील तीन वर्षात केंद्राच्या माध्यमातून पाच संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून या कौशल्य शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावण्यात येत आहेत.

इंडस्ट्री अकॅडमिया फोरमची स्थापना
याबाबत माहिती देताना कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ.राधाकृष्ण पंडित यांनी सांगितले, सध्या तंत्रज्ञान सातत्याने बदलत असून या बदलत्या काळानुसार उद्योगांना अद्यायावत कौशल्य प्राप्त असणाऱ्या मनुष्यबळाची गरज असते. म्हणूनच केंद्राने ‘इंडस्ट्री अकॅडमिया फोरम’ ची स्थापना केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्र भरातून उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना मार्गदर्शन करतात. बाजाराचा कल, त्यानुसार आवश्यक प्रशिक्षण, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, नोकरी विषयक संधी आदी विषयी माहिती दिली जाते. यामध्ये मारुती सुझुकी, बी. यु.भंडारी, कमिन्स, गोदरेज, पनामा ग्रुप, कल्पक पॉवर यांसारख्या अनेक कंपन्या जोडण्यात आल्या आहेत.

तीन विषयात बी.व्होक ची संधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे यासाठी ‘बी.व्होक इन मॅन्युफॅकचारींग स्किल, रिटेल मॅनेजमेंट, रीन्युएबल एनर्जी आदी तीन विषयात अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये ‘मारुती सुझुकी’ या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. यामध्ये आतापर्यंत २४ विद्यार्थ्यांनी काम करत प्रत्यक्ष कामाची सुरुवात देखील केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना महिन्याला मानधन देखील देण्यात येते. पुण्यातील चार शोरूम मध्ये हे विद्यार्थी सध्या ऑन जॉब ट्रेनिंग घेत शिकत आहेत.

पाच हजार सैनिकांना उद्योजकतेचे धडे
कौशल्य विकास केंद्राने बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपसोबत केलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकांना उद्योजकतेचे धडे देण्यात आले आहेत. अनेक सैनिकांना निवृत्त झाल्यानंतर काम करण्याची इच्छा असते, त्यातून ते नवे रोजगार निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. या सर्व सैनिकांना तज्ज्ञांच्या माध्यमातून उद्योजकतेचे धडे देण्यात आले आहेत.

जेम्स अँड ज्वेलरी डिझायनिंग अभ्यासक्रम
केंद्राच्या माध्यमातून जेम्स अँड ज्वेलरी डिझायनिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. २५ हून अधिक विद्यार्थी हा अभ्यासक्रम करत असून या सर्व विद्यार्थ्यांना यातून नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचे डॉ.पंडित यांनी सांगितले.

अपंग सैनिकांना अभ्यासक्रमाचा लाभ
कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तीन ते पाच महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात येत असून यामध्ये टेक्निकल रायटिंग, सोलर पी.वी सिस्टीम इंस्टॉलेशन, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ डोमेस्टिक इलेक्ट्रोनिक अप्लायंसेस’ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यातील रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ डोमेस्टिक इलेक्ट्रोनिक अप्लायंसेस या विषयात अनेक अपंग सैनिकांनी सहभाग घेत अभ्यासक्रम पूर्ण केला.

दरम्यान भविष्यात कौशल्य विकास केंद्राचा आणखी विस्तार करत विद्यार्थ्यांना अधिकाधिक अद्ययावत कौशल्ये देणे व रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्हाला वेळोवेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे आणि प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभत असते असे डॉ.राधाकृष्ण पंडित यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: