fbpx

आग्य्राहून सुटका ३५६ व्या स्मृतिदिनानिमित्त किल्ले राजगडावर शिवप्रेमींतर्फे पालखी सोहळा जल्लोषात साजरा

पुणे : जय भवानी, जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषात किल्ले राजगडावरील पाली दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान झालेल्या पालखीने गडावर प्रवेश केला आणि एकच जल्लोष झाला. पुष्पवृष्टी आणि तुतारीच्या सलामीने किल्ले राजगडाचा परिसर दुमदुमून गेला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी स्वत: सह सहका-यांची आग्य्राहून सुटका करुन राजगडावर पोहोचण्याच्या घटनेला ३५६ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल हा आनंदोत्सव गडावर साजरा करण्यात आला.

पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५६ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ह्यकिल्ले राजगड उत्सवह्णचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवराज शहाजी राजे छत्रपती, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक वसंतराव प्रसादे, गडकरी असलेले सुर्यकांत भोसले, डॉ.राजेंद्र हिरेमठ, मिलिंद लिमये, सुरेश परदेशी, आशिष पाळंदे, व्याख्याते योगेश पाटील, राहुल नलावडे, नाना शिर्के, अण्णा रेणुसे, संजय दापोडीकर, सुनील वालागुडे, संपत चरवड, समीर रुपदे, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सतीश सोरटे, मंगेश राव, शशी रसाळ, निलेश बारावकर, संजय शेंडकर, गुरुदत्त भागवत, अमोल व्यवहारे, निखिलेश ठाकूर, प्रशांत पायगुडे, रश्मी अनिल मते, अमित दारवटकर, सचिन यादव तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

युवराज शहाजी राजे छत्रपती म्हणाले, गड संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी आपले किल्ले, आपला इतिहास जगाच्या पटलावर पोहचवुया. नवीन संकल्पना आपण राबवुया, असेही ते म्हणाले.

सकाळी वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सुर्यकांत भोसले यांच्या हस्ते सुर्योदयाच्यावेळी ध्वजारोहण झाले. त्यानंतर पाली दरवाजा ते महाराजांच्या सदरेपर्यंत पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजगड पायथ्याला ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सरसेनापती येसाजी कंक यांच्या वंशजांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यश गियारोहक संस्था, राजगड गड संवर्धन, पाल गाव ग्रुप ग्रामपंचायत यांच्या सारख्या अनेक संस्था व कार्यकर्ते यांच्या सहयोगातून उत्सव साजरा झाला. वसंतराव प्रसादे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सन १६६६ रोजी किल्ले राजगड येथे पोहोचले. हा दिवस मागील ४१ वर्षांपासून दोन्ही संस्थांतर्फे साजरा करण्यात येतो. यंदा उत्सवाचे ४२ वे वर्ष आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: