दिलगिरी व्यक्त करूनही भ्याड हल्ला करणे हे घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते -चंद्रकांत पाटील
पुणे : लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवण्यास माझा कोणताही विरोध नव्हता. मात्र ज्या पद्धतीने हल्लेखोरानी माझ्यावर शाईफेक केली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला धरून नव्हती. मी दिलगिरी व्यक्त करूनही हा भ्याड हल्ला झाला. ही बाब घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते, असा सवाल भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना हल्ले खोरांना विचारला.
चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पैठण येथे एका कार्यक्रमादरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असे वक्तव्य केले होते. त्यावरून अनेक वाद सुरू असतानाच काल पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
दरम्यान, भुजबळ यांनी शाईफेक ही कित्येक लोकांवर होते मग हल्लेखोरांना ३०७ हे गंभीर कलम का लावले असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना पाटील यांनी प्रशासनाचे त्यांचे काम केले आहे आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे . भुजबळ यांना सुद्धा न्यायदेवतेने जमीन दिला आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा न्यायदेवतेवर विश्वास ठेवावा, असा पाटील यांनी भुजबळ यांना टोला हाणला.
