fbpx

पायाभूत सुविधांना मानवी चेहरा देतानाच वंचितांच्या विकासास अग्रक्रम – नरेंद्र मोदी

नागपूर : आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून वंचित-उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. स्थायी विकासाचे धोरण हे देशासाठी सर्वाधिक गरजेचे असून त्यास सर्व घटकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

मिहान (नागपूर) येथील एम्स संस्थेजवळील मंदीर मैदानावर आयोजित कार्यक्रमात हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गच्या उद्घाटनासह विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विविध धर्मक्षेत्रांच्या विकासातून सांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. जनधन योजनेच्या माध्यमातून ३५ कोटी गरीबांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले आहे. एम्स संस्थेच्या उभारणीसह प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये ही वैद्यकीय पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. या साऱ्यांच्या माध्यमातून मानवी संवेदना जोपासल्या गेल्या आहेत. जेव्हा अशा सुविधा देताना मानवी चेहरा नसतो तेव्हा त्याचा जनतेला मोठा फटका बसतो असे सांगताना त्यांनी गेली ३०-३५ वर्ष रखडलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाचे उदाहरण दिले.

महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नाची ही पूर्ती आहे. या प्रकल्पात विक्रमी वेळेमध्ये भूमी अधिग्रहण करण्यात आले. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली. खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्ग ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे.

विदर्भ – मराठवाड्याच्या विकासाला चालना : गडकरी

गडकरी म्हणाले, समृद्धी महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्यक होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील विकासाला चालना मिळेल. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच औरंगाबाद ते पुणे या महामार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांचे ग्रीन हायवे लवकरच पूर्णत्वास येईल, असे ते म्हणाले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: