fbpx

दिग्गजांनी जागवल्या कोत्तापल्ले सरांच्या आठवणी

पुणे : सहजता, स्पष्टता, विवेकवादी, समजून घेत काम करणे अशी स्वभाव वैशिष्ट्ये असणारे ज्येष्ठ साहित्यिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना विद्यापीठ तसेच विद्यापीठाबाहेरील दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि माजी विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र साहित्य परिषद तसेच भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, डॉ.विजय खरे, विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.प्रभाकर देसाई, इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ.संजय ढोले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख व मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.मनोहर जाधव, महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ.विश्वनाथ शिंदे, डॉ.पंडित विद्यासगर, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, प्रकाश पायगुडे, सुनीता राजे, स्नेहसुधा कुलकर्णी, जयदेव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. काळे म्हणाले, कोत्तापल्ले सरांचे आणि आमचे कौटुंबिक सबंध होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात निर्भिडता होती. प्रामाणिकपणा होता. समाजाला त्यांनी भरभरून दिले, त्यांची उणीव कायम भासत राहिल.

डॉ.संजीव सोनवणे म्हणाले, विद्यापीठात भाषा भवन व्हावे ही त्यांची आणि माझी इच्छा होती. त्यांची ही इच्छा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न राहू. मुलांना वाचनाची गोडी लावण्याबाबतच्या त्यांच्या आठवणी यावेळी डॉ.सोनवणे यांनी सांगितल्या. पुढील काळात विद्यापीठाने कोणाकडून मार्गदर्शन घ्यावे असा प्रश्न आता आम्हाला पडला आहे, असे डॉ.सोनवणे यावेळी म्हणाले.

विद्यापीठातील संत नामदेव महाराज सभागृहात आयोजित या आदरांजली कार्यक्रमासाठी समाजाच्या वेगवेगळ्या घटकातील नामवंत मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: