fbpx

आरोग्य चित्रपट महोत्सवात ‘योद्धा’ व ‘रेखा’ लघुपटाने मारली बाजी

पुणे : पी. एम. शाह फाउंडेशनच्या वतीने आयोजित ११ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. यावेळी ‘योद्धा’ या ऑटिझम विषयक माहितीपटाने तर ‘रेखा’ या त्वचेशी संबंधित निगा विषयावरील लघुपटाने महोत्सवात प्रथम पारितोषिक पटकावले. सुप्रसिद्ध अभिनेता ऋषीकेश जोशी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवाचे संचालक अ‍ॅड. चेतन गांधी यावेळी उपस्थित होते. ‘योद्धा’ या माहितीपटाचे दिग्दर्शक प्रमोद पेडणेकर व ‘रेखा’ या लघुपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांना यावेळी ऋषीकेश जोशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देत गौरविण्यात आले.

यावर्षीच्या महोत्सवासाठी जगभरातून १३० हून अधिक चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३१ चित्रपटांची महोत्सवासाठी निवड करण्यात आली होती. माहितीपटांच्या विभागात ‘दोन चाक ४३५ दिवस’ या गणेश धोत्रे दिग्दर्शित माहितीपटाने दुसरा तर ‘पिरीएड्स – चुप्पी की गुंज’ या ममता चोप्रा दिग्दर्शित माहितीपटाने तृतीय पारितोषिक पटकाविले. शिवाय लघुपट विभागात ‘नजरिया’ या किरण पोटे दिग्दर्शित लघुपटाने द्वितीय तर ‘गोष्ट अर्जुनची’ या अनुपम बर्वे दिग्दर्शित लघुपटाने तृतीय क्रमांक पटकाविला.

यावेळी बोलताना ऋषिकेश जोशी म्हणाले, “पूर्वी सगळे एकत्र नाटक बघायला जात, मग सिनेमे आले, मग घराघरात टीव्ही आला, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आला. यानंतर या सर्व गोष्टी इतक्या वैयक्तिक पातळीवर गेल्या की आपला प्रवास नार्सिझमकडे होऊ लागला. याचाच एक भाग म्हणून आज आधुनिक पद्धतीचे अनेक आजार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात उद्भवले आहे. फोटो त्यातही सेल्फी काढणे हा पण एक रोग झाला आहे. या आधुनिक रोगांवर देखील सिनेमे तयार व्हायला हवेत.”

महोत्सवात  दाखविल्या गेलेल्या चित्रपटांची निवड व परीक्षण आरोग्यसुविधा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. लीना बोरुडे, चित्रपट निर्माते विनय जवळगीकर आणि शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या अनुजा देवधर यांच्या समितीने केले.

Leave a Reply

%d bloggers like this: