पत्रलेखन उपक्रमाद्वारे मराठी भाषेची गोडी वाढविण्याचा प्रयत्न
पुणे : काही वर्षापूर्वीपर्यंत संदेश पोहचविण्याचे एक महत्वपूर्ण साधन असलेले पत्र आजच्या डिजिटल युगात मात्र दुर्मिळच झाले आहे. मात्र अजूनही या पत्राबाबत असलेली आत्मीयता कमी झालेली नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मनात पत्राबाबत अनेक आठवणी, भावना असतात. पत्रलेखन हे केवळ व्यक्त होण्याचे माध्यम नसून, भाषेशी जोडणारे एक साधन देखील आहे. त्यामुळेच या पत्रलेखनाचा आधार घेत, नागरिकांच्या विशेषतः तरुण पिढीच्या मनात मराठी भाषेबाबतची गोडी अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ‘पत्रास कारण की…’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खलबत्ता या सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनासाठी आणि तरुणाईला भाषेची गोडी लागण्यासाठी काम करणाऱ्या व्यासपीठाच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना पत्र पाठविण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे हे पत्र एखाद्या व्यक्ती अथवा प्राण्यासाठी नाही तर,एखाद्या निर्जीव वस्तूसाठी लिहिणे आवश्यक असणार आहे. पत्र पाठविण्यासाठी अंतिम मुदत २० नोव्हेंबरपर्यंत असून, नागरिकांना १०३, नचिकेत, १ ला मजला, प्रभात रस्ता, सर्व्हे नं. ३३/२५, ४ थी गल्ली, एरंडवणे, पुणे ४११००४ या पत्त्यावर पत्र पाठवायचे आहे.
या उपक्रमात प्रामुख्याने निर्जीव वस्तूला केंद्रस्थानी ठेवून मराठी भाषेत पत्र लिहायचे आहे. यात शुद्धलेखनाबाबत कोणत्याही अटी असणार नाहीत. तसेच यातील काही निवडक पत्रे संस्थेच्या सोशल मिडिया व्यासपीठावर प्रकाशित केली जातील. तर काही पत्रांना आयोजक स्वतः पत्राद्वारे उत्तरे लिहिणार आहेत. लिहिणे, व्यक्त होणे आणि संवेदनशीलता अशा तीन पैलूंचा विचार यामध्ये करण्यात आला आहे.
या उपक्रमाबाबत खलबत्ता’चे तेजस गोखले म्हणाले, “ आपल्या आजोबांच्या, आई-वडिलांच्या काळात पत्रलेखन हे संदेश वहनाचे एक महत्वाचे माध्यम होते. त्याबाबतच्या अनेक आठवणी किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. पत्र लिहिणे हीदेखील एक कला असायची. मातृभाषेतून पत्र लिहताना भाषा, शब्द, वाक्यरचना योग्य असेल, याबाबत काळजी घेतली जायची आणि त्यामुळेच भाषा सुधारण्यास त्याबाबत गोडी निर्माण होण्यास मदत मिळत असे. हीच बाब लक्षात घेत, आम्ही पत्र लेखनाचा हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले. त्यानुसार या उपक्रमास सुरवात झाली असून, नागरिकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपक्रम सुरु झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक दिवशी सुमारे १७ ते १८ लोकांची पत्रे आम्हाला मिळत असून, हेडफोन, पत्रपेटी, शाळेचा गणवेश, लोकल ट्रेन अशा विविध विषयावर लोक पत्राच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. ’’
