जितेंद्र आव्हाड यांनी महिलेचा विनयभंग केला का? याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी -अजित पवार
पुणे : काल कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्यावरजेव्हा ही घटना घडली तेव्हा गाडीमध्ये मुख्यमंत्री बसलेले होते. त्यांच्यासमोर ही घटना घडली असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी. कसे का होईना, पण तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात. या प्रकरणी स्पष्टता द्यावी.असं विरोधी पक्ष नेते अजित पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
या पत्रकार परिषदेला विरोधी पक्ष नेते अंबा साहेब दानवे, आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड यांनी 72 तासात दोन गुन्हे दाखल झाल्याने कंटाळून राजीनामा देतो असे म्हणाले आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा विनंती आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी केले. ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या शरद पवारांनी अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक स्थित्यंतर पाहिलीत. हे लक्षात घेता आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये असे अजित पवार यांनी म्हटले.
समोर आलेल्या व्हिडिओनुसार, जितेंद्र आव्हाड हे अनेकांना हाताने बाजूला करत होते. त्याच प्रमाणे त्यांनी या महिलेला बाजुला केले. बाकी काही घडलेले नाही. मुख्यमंत्र्यांची कार काही फूट अंतरावरच होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढं येऊन विनयभंगाचा प्रकार घडला नसल्याचे सांगायला पाहिजे. तुम्ही कशाही प्रकारे मुख्यमंत्री झाला असलात तरी तुम्ही महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात.असेही पवार म्हणाले.
राज्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला बगल देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अशा घटना समोर आणल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. विवियाना मॉल प्रकरणातील प्रेक्षकाने आव्हाड यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. तरीदेखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आला नाही. दिवस बदलतात. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात असे सांगताना अजित पवार यांनी नियमांचे, कायद्याचे पालन होत नसेल तर कोणत्याही पक्षाचा आमदार का असेना कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
