fbpx

युवा कलाकारांचा ‘स्वरउन्मेष’ हा सांगीतिक कार्यक्रम ३०-३१ जुलै रोजी होणार

पुणे : भारतीय शास्त्रीय संगीताचा उदय साजरा करण्यासाठी आणि तरुण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्यावतीने ‘स्वरउन्मेष’ या दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ३० आणि ३१ जुलै रोजी रात्री ९ वाजता कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असेल.

कार्यक्रमात पहिल्या दिवशी युवा गायक ईश्वर घोरपडे, रुजुता लाड आणि आदित्य मोडक यांचे गायन होईल. घोरपडे यांनी लातूर येथे पं.विठ्ठलराव जगताप तर पुण्यात पं. विजय कोपरकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र येथे ते संगीत शिकवतात. ‘द डिसाईपल’ या आपल्या पदार्पणाच्या चित्रपटात फिल्मफेअर पुरस्कार मिळविणाऱ्या आदित्य’ने वयाच्या पाचव्या वर्षीपासूनच संगीताचे धडे घ्यायला सुरवात केली होती. गेली दोन दशके तो ग्वालियर घराण्याचे प्रसिद्ध गायक डॉ.राम देशपांडे यांच्याकडून संगीताचे धडे घेत आहे. संगीत क्षेत्रातील मानाच्या पं. सवाई गंधर्व शिष्यवृत्ती, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्याने मिळविल्या आहेत. रुजता लाड हिने गुरुवर्य भालचंद्र पात्रे यांच्याकडून संगीताचे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. नंतर तिने जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका गानयोगिनी पंडिता धोंडूताई कुलकर्णी यांच्याकडून सुमारे १२ वर्षे प्रशिक्षण घेतले. सुधीर नायक यांच्याकडून ती हार्मोनियम शिकत आहे. सध्या ती विदुषी डॉ. अश्विनी भिडे – देशपांडे यांच्याकडून अंतर्गत प्रशिक्षण घेत आहे.

कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी श्रुती विश्वकर्मा आणि रमाकांत गायकवाड यांचे गायन, तसेच आणि मानस कुमार यांचे व्हायोलिन वादन होणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार नारायण शास्त्री गोडबोले यांची नात आणि किराणा घराण्याचे गायक जयंती विश्वकर्मा आणि गणपतराव विश्वकर्मा यांची कन्या व शिष्या असलेल्या श्रुती हिने ग्वालियर घराण्याच्या गायिका वीणा सहस्रबुद्धे आणि आग्रा व भेंडीबाजार घराण्याचे गायक पं. केदार बोडस यांच्याकडून संगीताचे धडे घेतले आहे.संगीत क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार आणि शिष्यवृत्ती मिळविलेल्या श्रुती हिने भारतातील अनेक प्रसिद्ध संगीत महोत्सवात आपले गायन सादर केले आहे. भारतीय शास्त्रीय गायन संगीतातील एक तरुण आणि आश्वासक उगवता तारा मानल्या जाणाऱ्या रमाकांत याने उस्ताद बडे गुलाम अली खान यांचे शिष्य जगदीश प्रसाद यांच्याकडून संगीताचे धडे गिरविले. सध्या ते उस्ताद नयन घोष यांच्याकडे किराणा आणि पटियाला शैलीचे शिक्षण घेत आहेत. भौतिकशास्त्र विषयातील पदवी मिळवणाऱ्या मानस याने व्हायोलिन वादनातील सुरवातीचे शिक्षण आपले वडील जी. चमूआ यांच्याकडून घेतले. त्यानंतर गुवाहाटी येथील पं. बिद्युत मिस्रा यांच्याकडे ११ वर्षे व्हायोलिन वादनाचे कठोर शिक्षण घेतले.

प्रमुख कलाकारांना हार्मोनियमवर अभिषेक शिनकर, तबल्यावर प्रणव गुरव आणि तनय रेगे साथ करणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: