fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsPUNE

सांस्कृतिक परंपरेचे केवळ जतन नको तर त्या आत्मसात करुन प्रगती करा – ज्येष्ठ नृत्यांगना डाॅ.सुचेता भिडे चापेकर

पुणे : भारत हा एकमेव असा देश आहे ज्यामध्ये कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, मणिपुरी, कुचीपुडी सारख्या अभिजात नृत्यशैली आहेत. या शिवाय देखील अनेक शैलींच्या नृत्य परंपरा त्यांच्या परीने त्यांच्या छत्रात प्रगत होत गेल्या, परंतु सामान्य नागरिकांपर्यंत त्या पोहोचल्या नाहीत. नृत्यशैली वेगवेगळ्या असल्या तरीही त्यांचे रसानंद हे एकच ध्येय आहे. ज्या नृत्यशैली जनमानसांपर्यंत पोहोचल्या नाहीत त्यांनी कथक आणि भरतनाट्यम चा प्रसार कसा झाला याचा अभ्यास करायला पाहिजे. परंपरा म्हणजे केवळ जतन नाही तर आत्मसात करुन त्याची प्रगती करणे होय, असे मत ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना डाॅ.सुचेता भिडे चापेकर यांनी व्यक्त केले.

आसामच्या सत्र माॅनेस्ट्रींमध्ये जतन करण्यात आलेल्या भारतातील आठ प्रमुख शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक सत्रिय नृत्याची वैशिष्ट्ये विस्तृतपणे सांगणाऱ्या डाॅ.देविका बोरठाकूर लिखित ‘ सत्रिय- क्लासिकल डान्स फाॅर्म आॅफ माॅनेस्ट्रीज ‘ या पुस्तकाचे प्रकाशन भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या वतीने करण्यात आले. महाविद्यालयाच्या एरंडवणे येथील न्यू लॉ कॉलेज ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे, डाॅ एस.एफ. पाटील, विवेक रणखांबे, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे संचालक पं.शारंगधर साठे, डाॅ देविका बोरठाकूर उपस्थित होते.

डॉ. सुचेता भिडे चापेकर म्हणाल्या, शहरी संस्कृतीत लोकनृत्य हे स्टेजवर सादर करण्यापुरतेच राहिले आहेत. रंगमंचावर शेतकरी नृत्य केले जाते परंतु शेतात चिखलात फेर धरून नाचत नाहीत, त्यामुळे तसे नृत्य हे कृत्रिम वाटते. पुण्याने सर्व प्रकारच्या नृत्य शैलींना आपलेसे केले आहे त्यामध्ये प्राचीन सत्रिय नृत्य शैलीचे देखील स्वागत आहे, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

शमा भाटे म्हणाल्या, रोहिणी भाटे यांनी ७५ वर्षांपूर्वी कथकचे बीज पुण्यात रोवले आणि त्याचा मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये प्रसार झाला. आज पुण्यात कुठेही गेलात तरी शास्त्रीय नृत्याचे क्लासेस दिसतात. अशा पद्धतीने पुणेकरांनी कथक नृत्याला आपलेसे केले आहे.

डॉ. एस. एफ. पाटील म्हणाले, भारतामध्ये नृत्य हा सांस्कृतिक विविधतेचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारतातील सांस्कृतिक घटक हे वैविध्यपूर्ण आहेत परंतु एका समान धाग्याने बांधले गेले आहे. प्रत्येक राज्याचा सांस्कृतिक इतिहास हा समृद्ध आहे.

पं.शारंगधर साठे म्हणाले, केवळ भारतातच नव्हे तर परदेशात देखील सत्रिय नृत्य शिकले आणि शिकविले जाते. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट ही शैक्षणिक अभ्यासक्रमात सत्रिय नृत्याचा समावेश करणारी आसामबाहेरील भारतातील पहिले विद्यापीठ आहे. सध्या बरेच विद्यार्थी हे नृत्य शिकत आहेत परंतु त्यांच्याकडे या कला प्रकाराबद्दल क्वचितच वाचन साहित्य आहे. म्हणूनच या शैलीतील वैशिष्ट्ये सविस्तरपणे समजावून सांगण्यासाठी पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. आसाम मधील विद्यापीठांसोबत मिळून सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा कार्यक्रम देखील होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: