fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsPUNE

कोणासमोर नतमस्तक व्हावे, हे कळणे म्हणजे जीवनाचे सौभाग्य- ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर

पुणे : काही व्यक्ती त्यांचे वर्णन करणे, विशेषण देणे त्यांचे श्रेष्ठत्व वर्णावे अशा असतात. परंतु काही व्यक्ती अशा असतात, ज्यांच्यासमोर केवळ नतमस्तक व्हावे. कोणासमोर नतमस्तक व्हावे, हे कळणे म्हणजे जीवनाचे सौभाग्य आहे. आपण व्यक्तीला नाही तर पदाला नमस्कार करतो. पद मोठे आहे पण प्रतिती मोठी नाही. सर्वांगिण जाणीव आपल्यामध्ये प्रकट होणे म्हणजे नतमस्तक होणे आहे, असे मत ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन, कीर्तन व श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवाचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी ह.भ.प. भगवतीताई सातारकर – दांडेकर, ट्रस्टचे माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, कुमार वांबुरे, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने आदी उपस्थित होते. ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर हे जगद््गुरु तुकाराम महाराजांचे निवडक अभंग याविषयावर निरुपण करीत आहेत.
चिन्मय महाराज सातारकर म्हणाले, आई-वडील, बॉस यांचे वर्णन करता येते. परंतु ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, असे साधू-संत असतात. जोपर्यंत नतमस्तक होण्याची जागा मिळत नाही, तोपर्यंत जीवनाला ठिकाणा नाही. संत तुकाराम महाराज यांनी लाखो लोकांना प्रेम, श्रद्धा आकर्षण निर्माण केले. जीवन जगायचे कसे? हे कळणे ज्यामुळे उमगते ते संतबोध आणि संत चरित्र. भगवंताला देखील ठिकाणा साधू-संतांमुळे मिळाला. त्यांच्यामुळेच भगवंत आपल्यापर्यंत पोहोचले. आई-बाप केवळ समोर असून उपयोग नाही तर ते आपल्याला कळले पाहिजेत. मातृ-पितृ संस्कारात आपण वाढलो, परंतु आज आई बाप समजून घ्या असे सांगावे लागते, असेही त्यांनी सांगितले.
चातुर्मास प्रवचनांतर्गत संपूर्ण हरिपाठ याविषयावर दिनांक १७ ते ३१ जुलै दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ८ यावेळेत प्रवचने होणार आहेत. यामध्ये ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर व ह.भ.प. भगवतीताई सातारकर – दांडेकर या निरुपण करणार आहेत. तर, दिनांक १ ते ६ आॅगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत.
दिनांक ७ ते १३ आॅगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत श्री गणपती अथर्वशीर्ष याविषयावर निरुपण होणार आहे. यामध्ये गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड शास्त्री हे निरुपण करणार असून श्री गणेशाशी निगडीत विविध कथा, अथर्वशीर्षाचे महत्व व महात्म्य याविषयी ते बोलणार आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले आहेत. तरी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: