शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी वृद्धांना योग प्रशिक्षण

पुणे: वृद्ध व्यक्तींना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य लाभावे, या दृष्टिकोनातून श्री हिरालाल स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट आणि चिरंजीव फाऊंडेशनच्या वतीने निवारा वृद्धाश्रम येथे योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सन २०१९ पासून हा उपक्रम विनामूल्य राबविण्यात येत आहे.

तब्बल १५४ वर्षांपासून वृद्धांचा सांभाळ करण्याचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘निवारा’ संस्थेच्या कामकाजाला हातभार लावण्याच्या दृष्टीने आणि वृद्ध व्यक्तींना शारीरिक आरोग्यासह मानसिक स्वास्थ्य लाभावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे योग प्रशिक्षक डॉ. सुनंदा राठी यांनी यावेळी सांगितले.

‘निवारा’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वांसाठी योग’ या कार्यक्रमात डॉ. राठी यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्व विशद केले. त्याच प्रमाणे डॉ. राठी यांच्यासह चिरंजीव फाऊंडेशनच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी स्वामी विवेकानंद योग अनुसंधान विद्यापीठाच्या सांशोधनाद्वारे विकसित करण्यात आलेले आसने, प्राणायाम, ओंकार जप, गुंजन आदी योगप्रकारांचे प्रशिक्षण दिले. योग प्रशिक्षक विष्णुप्रिय यांनी आसने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतले तर योग सोसायटी, महाराष्ट्रचे सदस्य बापू पडळकर यांनी ओंकार जपाचे महत्व विशद केले.

नियमित योगाभ्यास करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात श्री हिरालाल मारुती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि पतंजली योगपीठाचे सदस्य रामकुमार राठी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ‘निवारा’चे कार्याध्यक्ष विश्वनाथ बडवे, विश्वस्त रवींद्र मराठे, सदस्य राजीव नातू, चिरंजीव फाऊंडेशनचे सुरेंद्र राठी आदी मान्यवर उपस्थित होते. माया चुत्तर यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: