Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

पाणी समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम

पिंपरी : पिंपळे निलख विशालनगर परिसरात मागील तीन वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई भासत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या परिसरातील नागरिकांना टँकरद्वारे पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. नागरिक वेळोवेळी महानगरपालिकेचा मिळकत कर आणि पाणीपट्टी भरत असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे येथील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन विशाल नगर आणि पिंपळे निलख गावठाण येथे स्वतंत्र दोन पाण्याच्या नवीन टाक्या उभाराव्यात याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पासून येथील दहा हजार नागरिकांचे सह्यांचे निवेदन घेण्याचा उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी सुरू केला आहे.

पिंपळे निलख गावठाण, पंचशील नगर, गणेश नगर, रक्षक सोसायटी, विशाल नगर, आदर्श नगर, जगताप डेअरी येथील परिसरासह विविध सोसायट्यांमध्ये देखील अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना पैसे देऊन टॅंकरने पाणी घ्यावे लागत आहे यावर महानगरपालिकेने स्वखर्चाने पाणीपुरवठा करावा अन्यथा नागरिकांनी टॅंकरचे दिलेले बिल प्रशासनाने अदा करावे अशी मागणी सचिन साठे यांनी केली आहे. या परिसरातील दहा हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन १० मे पर्यंत घेवून स्वाक्षरी पत्र बुधवारी (दि. ११ मे २०२२) आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना भेटून देण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी देखील या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सचिन साठे यांनी शिष्टमंडळासह प्रशासक राजेश पाटील यांना भेटून निवेदन दिले होते. तरी देखील यावर प्रशासनाने अद्याप कारवाई केलेली नाही. आता विस्कळीत पाणी पुरवठा विषयी आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील साठे यांनी यावेळी दिला आहे.

१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पिंपळे निलख विशालनगर येथे सुरू करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेत उद्घाटन प्रसंगी माजी पोलीस पाटील भुलेश्वर नांदगुडे, विजय जगताप, नितीन इंगवले, कैलास चव्‍हाण, प्रकाश बालवडकर, ज्ञानोबा बालवडकर, साहेबराव नांदगुडे, दिलीप बालवडकर, संजय दळवी, अनंत कुंभार, सुरेश बापू साठे, अनिल संचेती, नाना सदाकाळ, जगदाळे मामा, नाना गुंजाळ, बाळासाहेब कांबळे आदी प्रमुख नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading