fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest News

जवानांच्या कुटुंबियांवर भाष्य करणाऱ्या ‘भारत माझा देश आहे’चा ट्रेलर प्रदर्शित

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत… ही प्रतिज्ञा अगदी बालपणापासूनच आपल्या मनावर कोरली गेली आहे. अनेकांच्या भावना या प्रतिज्ञेशी जोडल्या गेल्या आहेत. या भावनेशी जोडलेली अशीच एक संवेदनशील कथा आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पांडुरंग कृष्णा जाधव यांनी ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटातून केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित हा चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ज्या वेळी सीमेवर सैनिक लढत असतात, जेव्हा टीव्हीवर युद्धाची ब्रेकिंग न्यूज येते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या मनाची घालमेल, आपला माणूस तिथे सुखरूप आहे का, ही सतत सतवणारी चिंता, एकंदरच सैनिकांच्या कुटुंबियांवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. विषय जरी अतिशय संवेदनशील असला तरी खूप हलक्याफुलक्या पद्धतीने तो चित्रपटात मांडण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये आपला मुलगा परत यावा याकरता सोनूचा खास मित्र असलेल्या नाऱ्याचा बळी देण्याचा नवस सोनूची आजी बोलते. आता नाऱ्याचा बळी जाणार का आणि सोनूचे बाबा परत येणार का, हे चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. या चित्रपटातील गाणी समिर सामंत यांची असून या गाण्यांना अश्विन श्रीनिवासन यांचे संगीत लाभले आहे. तर महालक्ष्मी अय्यर, अश्विन श्रीनिवासन, अंकिता जोशी, संकेत नाईक, अथर्व श्रीनिवासन, विश्व झा जाधव, तनिष्का माने यांनी या गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. या चित्रपटाची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांचीच असून पटकथा आणि संवाद निशांत नाथराम धापसे यांचे आहेत.

यावेळी बॅालिवूड अभिनेता मनोज वाजपेयी म्हणाले, ‘’ ज्यावेळी मनात एखादी भावना असेल तेव्हाच असे विषय हाताळले जातात. अशा प्रकारचा विषय हाताळणे सोपी गोष्ट नाही. कारण हा खूप नाजूक विषय असून अनेकांच्या भावना याच्याशी जोडलेल्या आहेत. ज्यावेळी सैनिक सीमेवर लढत असतात, त्याचवेळी त्यांच्या कुटुंबाचीही घरी एकप्रकारची लढाईच सुरु असते. पांडुरंग जाधव यांचा चित्रपटासाठी हा विषय निवडणे, हा नक्कीच कौतुकास्पद प्रयत्न आहे. ट्रेलर पाहून कळतेय की हा खूपच उत्सुकता वाढवणारा चित्रपट आहे. सगळ्याच कलाकारांनी विशेषतः बालकलाकारांनी खूप सुंदर अभिनय केल्याचे दिसत आहे.’’

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading