अंमली पदार्थाचा पुरवठा रोखण्यासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न करावेत- सह पोलीस आयुक्त संजय शिंदे

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अंमली पदार्थाच्या पुरवठ्यास प्रतिबंध घालण्यासाठी सर्व यंत्रणांना संयुक्तरित्या प्रयत्न करावेत; अंमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा होत असल्यास वेळीच त्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहआयुक्त संजय शिंदे यांनी दिले.

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या हिमानी दामीजा, अंमली पदार्थ नियंत्रक विभागाचे विजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक महादेव कनकवले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे महेश कवटिकवार, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक युवराज शिंदे, टपाल विभागाचे व्ही. एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. अंमली पदार्थाचा पुरवठा रोखण्यासाठी कौशल्यपूर्वक नियोजन करावे. पुणे व पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात अंमली पदार्थांचे उत्पादन होत असल्यास त्याचा अभ्यास करुन प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. अंमली पदार्थाची तपासणी किटचा वापर करुन तपासणी करावी.

अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व त्यांना पुरवठा करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करा. अंमली पदार्थाचे सेवन केल्याने बाधित झालेल्या नागरिकांचे पुर्नवसन होण्याच्यादृष्टीने त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याची कार्यवाही करावी. शाळा व महाविद्यालयात जनजागृती विषयक मोहिम राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थाचा पुरवठा व सेवन रोखण्यासाठी विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: