गोळवलकर गुरुजी विद्यालयात “माहितीचे सात दिवस” उपक्रम

पुणे : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक पथावरील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात 22 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 या दिवसात ” माहितीचे सात दिवस ” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 22 एप्रिल आणि 25 एप्रिल रोजी ‘ सेफ किड्स फाउंडेशन ‘ मार्फत विद्यार्थ्यांना आगीपासून आपले रक्षण कसे करावे आणि रस्ते सुरक्षा याबद्दल कल्याणी पवार यांनी मार्गदर्शन केले.

23 एप्रिल रोजी पक्षी निरीक्षक पराग साळसकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 26 एप्रिल रोजी अग्निशमन बंब शाळेत आणून त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. 27 एप्रिल रोजी सारंग ओक विद्यार्थ्यांना ग्रहणाविषयी माहिती सांगणार आहेत. 28 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका आणि तिचे कार्य, आतील रचना, रुग्णासाठी आवश्यक असणारी सामग्री प्रत्यक्ष पहायला मिळणार असून त्याची माहिती सांगितली जाणार आहे. तर 29 एप्रिल रोजी रोटरी क्लब मार्फत हृदयविकाराशी संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी ” चांगला आणि वाईट स्पर्श ” याबद्दल जागृती व्हावी म्हणून ‘ वाफाळलेले दिवस ‘ हे नाटक मुलांना दाखवण्यात येणार आहे.

जवळपास गेले दीड वर्ष विद्यार्थी कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळेपासून दूर राहिले असून त्यांना अभ्यासाबरोबरच विविध घटकांची माहिती त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक ठरेल असा विश्वास मुख्याध्यापिका सौ लिना तलाठी यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. प्रशालेतील शिक्षक  सुभाष निंबाळकर , अक्षय कुलकर्णी आणि सौ मीनल मानकर – एरंडे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: