माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता

चांदिवाल आयोगाकडून २०१ पानी अहवाल सादर

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप केले. यांची दखल घेत राज्य सरकारने या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने चौकशी केल्यानंतर सुमारे २०१ पानांचा अहवाल तयार करून ग्रुहमंत्र्यांकडे सुपुर्द केला. गृहमंत्र्यांनी तो अहवाल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. याआधी चांदीवाल आयोगासमोर परमबीरसिंग यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याची कबुली दिली. आता सचिन वाझे यानेही पैसे न दिल्याचे सांगितल्याने देशमुख यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध करण्यात ते यशस्वी होतील, असे बोलले जात असल्याने अनिल देशमुखांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, चांदीवाल आयोगासमोर वाझेची साक्ष झाली. १०० कोटी खंडणी वसुली प्रकरणात चांदीवाल आयोगासमोर मंगळवारी सचिन वाझे याची साक्ष झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली. यावेळी अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. यावेळी वाझे याने आपण अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण अनिल देशमुख यांच्या कोणत्याही सहकार्‍यांनाही पैसे दिले नसल्याचे सांगितले.

परमबीरसिंग यांच्यानंतर वाझे यानेही देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत उत्तर दिल्याने हे प्रकरण निकालात काढले जाण्याची शक्यता आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही अटक केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र, चांदीवाल आयोगासमोर परमबीरसिंग यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याची कबुली दिली आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: