PM मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून …. राणा दांपत्यांची माघार

मुंबई : राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वादातून आता खुद्द रवी राणा यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्याने ही माहिती दिली. आमदार रवी राणा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहे.त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही माघार घेत आहोत, कुणाच्या दबावाखाली येऊन नाही, असेही ते म्हणाले.लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. याच अनुषंगाने राणा दाम्पत्याने आपले आंदोलन माघार घेतली असल्याचे म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्ही चुकीचे वक्तव्य केले नाही. हनुमान चालिसेसाठी आमचा आग्रह होता, मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. आम्ही भक्तिभावाने मातोश्रीवर जाणार होतो. मात्र त्यांनी येऊ दिले नाही. शिवसेनेचे जेवढे आमदार निवडून दिले ते केवळ मोदींच्या भरवशावर आले आहेत. निवडणुकांच्या काळात बाळासाहेबांचा फोटो छोटा होता आणि पंतप्रधानाचा फोटो मोठा होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने शिवसैनिकांनी माझ्याघरावर हल्ला केला. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही राणा यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत खासदार राणा म्हणाल्या की, आमच्या अमरावतीच्या घरापर्यंत हे सुरू आहे. शिवसेनेच्या गुंडांना आम्ही घाबरत नाही. घाबरले असतील तर ते मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांनी गुंड पाठवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाठवलेले गुंड राणांना कधी मारतात याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे, असा गंभीर आरोपही नवनीत राणा यांनी केला.त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाबरले आहेत आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांचा आडोसा घेतला आहे. आम्ही समजूतदारपणा दाखवून आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी गुंड पाढवून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा शिवसैनिकांना आणि गुडांना आम्ही घाबरत नाही. घाबरलो असतो तर मुंबईत आलो नसतो. असे खासदार नवनीत राणांनी म्हटले आहे.

अजित पवार मुख्यमंत्री असते, तर ही परिस्थिती ओढवली नसती

नवनीत राणा म्हणाल्या की, मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. अजित पवार जर मुख्यमंत्री असते तर ही परिस्थिती आली नसती. आमच्या अमरावतीच्या घरावर हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना काहीच काम उरले नाही का, असा सवालही त्यांनी केला. गुंडाना उत्तर देण्यासाठी मी इथे आलेले नाही, तर जनसेवेसाठी आले आहे, असेही नवनीत राणांनी म्हटले.

Leave a Reply

%d bloggers like this: