fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान सोहळा

पुणे : गुरुवर्य स्व. निवृत्तीराव मारणे (वस्ताद) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित विशेष कार्यक्रमात ज्यांनी शंभरहून अधिक वेळा रक्तदान केले आहे, अशा शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. कोविड काळात ज्यांनी सर्वाधिक वेळा प्लाझ्मा दान करुन अनेकांचे जीव वाचविले, अशा पुणेकरांना यावेळी गौरविण्यात आले. चला रक्तदान करुया… मैत्री रक्ताची जपूया… असा संदेश देण्याकरीता विविध क्षेत्रातील मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

रामदास मारणे, शाम मारणे आणि मित्र परिवारतर्फे गुरुवर्य स्व. निवृत्तीराव मारणे (वस्ताद) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सात शतकवीर रक्तदात्यांचा गौरव फर्ग्युसन कॉलेज मुख्य प्रवेशद्वारासमोरील सुदर्शन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठाडिया, आनंद सराफ, डॉ.शैलेश गुजर, किसनराव भोसले, नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, दत्ता खाडे, आदित्य माळवे, आयोजक रामदास मारणे, शाम मारणे, उज्वला मारणे आदी उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

रक्तदाते प्रदीप कपिले (१२५ वेळा), सदाशिव कुंदेन (१०९ वेळा), संतोष गोपाळ (९९ वेळा), अंजू सोनावणे (९८ वेळा), सुरेश सकपाळ (८६ वेळा), शंतनु पानसरे (७५ वेळा) आणि अजय मुनोत (५० वेळा रक्तदान व १४ वेळा प्लाझ्मादान) यांचा गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरुप होते.

आनंद सराफ म्हणाले, रक्तदान करणे हे शारिरीक व मानसिक सुदृढतेचे कार्य आहे. अपघातग्रस्त रुग्णांना जीवनदान देण्याचे पवित्र कार्य रक्तदानाद्वारे घडते. त्यामुळे अशा रक्तदात्यांचा सन्मान करणे व त्यांच्या कार्याची समाजाने दखल घेणे कौतुकास्पद आहे.

प्रा.ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. जो रक्तदान करतो, त्याचे ज्याला रक्त दिले, त्या व्यक्तिशी रक्ताचे नाते जोडले जाते. रक्ताचा तुटवडा असताना, अशा प्रकारची रक्तदान शिबीरे महत्वाची आहेत. कोविड काळात मोठया प्रमाणात शिबीरे झाले. मात्र, आता पुन्हा एकदा नियमीतपणे शिबीरे होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अमर शर्मा, सतिश पिल्ले, अभिजीत धुमाळ, विजय आबनावे, विरेंद्र गट, मयूर उत्तेकर, संगीता गट आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading