fbpx

मनसेच्या ‘हनुमान चालिसा’ला राष्ट्रवादीचे जशास तसे उत्तर

हनुमान मंदिरात करणार इफ्तार पार्टी

पुणे : मनसेच्या ‘हनुमान चालिसा’च्या मागणीला राष्ट्रवादीने जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादीकडून आज इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज (दि.15) संध्याकाळी सव्वा सहा वाजता इफ्तार पार्टी होणार आहे. तर उद्या (दि.16) हनुमान जयंत्ती दिवशी दुधाने लॉंन्स, कर्वेरोड येथे हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण आणि त्यानंतर इफ्तार पार्टीचे राष्ट्रवादी तर्फे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

आज (दि.15) साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केलं असून ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिक्षण महर्षी पी ए इनामदार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोयेकर यांची देखील प्रमुख उपस्थिती असेल.

दरम्यान, मनसेच्या मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मंगणीनंतर आता रोज नवनवीन राजकारण पाहायला मिळत आहे. सध्या रमजान सुरू असल्याने कोणताही वाद नको, म्हणून मनसे नेते वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता ते काय करतात, याविषयी त्यांनी अजून सांगितलेले नाही. उद्या राज ठाकरे हनुमानाचा महाआरती करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: