fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भारत कोण्या एकट्याची जहागीर नाही प्रधानमंत्री संग्रहालयाला काँग्रसेचा विरोध दुर्दैवी – माधव भांडारी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथे तीन मूर्ती भवन येथे उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला काँग्रेस पक्षाने केलेला विरोध हा त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या सरंजामी वृत्तीचा निदर्शक आहे. देश बदलला आहे याची जाणीव ठेऊन काँग्रेस पक्षाने आता तरी भारत हा कोण्या एकट्याची जहागीर असल्याची भावना सोडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष  माधव भांडारी यांनी शुक्रवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत केले.

माधव भांडारी म्हणाले की, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे तीन मूर्ती भवन येथे वास्तव्य होते. तेथे देशाचे पंतप्रधान म्हणून आतापर्यंत काम केलेल्या सर्व चौदा नेत्यांच्या कार्याचे स्मरण करणारे संग्रहालय उभारले आहे. येथे केवळ भारतीय जनता पार्टीचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी किंवा भाजपाचा समावेश असलेल्या जनता पार्टीचे दिवंगत पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्मरण केलेले नाही तर काँग्रेसच्या आणि अन्य पक्षांच्या माजी पंतप्रधानांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख आहे. नेहरू गांधी घराण्याच्या नियंत्रणात असलेल्या काँग्रेस पक्षाने ज्या काळजीवाहू पंतप्रधान गुलजारीलाल नंदा, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची उपेक्षा केली त्यांचाही गौरव या संग्रहालयात केलेला आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी या संग्रहालयावर टीका करून ते अन्यत्र उभारायला हवे होते, असे म्हणणे दुर्दैवी आहे.

त्यांनी सांगितले की, देशात लोकशाही असली तरी प्रत्यक्षात एका पक्षाने म्हणजे काँग्रेसने आणि त्यातही एकाच घराण्याने म्हणजे नेहरू गांधी घराण्याने या देशावर राज्य करत रहावे अशी काँग्रेस पक्षाची मानसिकता आहे. इंदिरा इज इंडिया असे काँग्रेस नेते देवकांत बरुआ म्हणाले होते. त्यामुळे नेहरूंच्या तीनमूर्ती भवनमध्ये अन्य पंतप्रधानांच्या कार्याचा गौरव काँग्रेस पक्षाला सहन होत नाही. तथापि, काँग्रेसने हे ध्यानात घेतले पाहिजे की, भारत बदलला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत जनतेने काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्याही जागा दिल्या नाहीत. आता तरी काँग्रेसने देशाला एका घराण्याची जहागीर समजणे बंद करून आपल्या पक्षातील अन्य नेत्यांचा आणि इतर पक्षातील नेत्यांचा आदर करण्याची सवय लाऊन घ्यावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading