Sunday, November 8, 2026
Latest NewsPUNE

पुणे महानगरपालिका : 3 हजार कोटींचा टीडीआर देऊन ‘ही’ जागा ताब्यात घेण्याची गरज नाही – विवेक वेलणकर 

पुणे : संगमवाडी येथील सिटी सर्व्हे नंबर ९२ आणि ९३ (नाईक बेट) या ३४ एकर (१४ लाख ८१ हजार चौरस फूट) जागेचा हस्तांतर विकास हक्क टीडीआर देण्याबाबतचा विचार महापालिकेच्या स्तरावर सुरू आहे.सध्याच्या बाजारभावानुसार या टीडीआरची किंमत सुमारे तीन हजार ३३ कोटी रुपये आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या आरक्षणाच्या जागेचा आणि किमतीचा टीडीआर दिला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर “टीडीआर देऊन ही जागा ताब्यात घेण्याची गरज नाही. या बेटावर उद्यान करणे महत्त्वाचे नाही, तेथे आधीच वनराई आहे. असे असताना ते ताब्यात घेऊन त्याच्या मोबदल्यात टीडीआर देऊन शहरात क्रॉंक्रिटचे जंगल उभारणे योग्य होणार नाही”, असे म्हणत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या टीडीआरला विरोध दर्शविला आहे.

वेलणकर म्हणाले, टीडीआर देऊन ही जागा ताब्यात घेण्याची गरज नाही. पावसाळ्यात अनेकदा ती जागा पाण्याखाली जाते. त्याऐवजी आराखड्यातील अन्य महत्त्वाच्या पायाभूत सुविधा असलेल्या आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्याला प्राधान्य द्यावे. त्यामुळे नाईक बेटाचा टीडीआर देण्याचा विचार महापालिकेने तातडीने थांबवावा. या बेटावर उद्यान करणे महत्त्वाचे नाही, तेथे आधीच वनराई आहे. असे असताना ते ताब्यात घेऊन त्याच्या मोबदल्यात टीडीआर देऊन शहरात क्रॉंक्रिटचे जंगल उभारणे योग्य होणार नाही.

एवढ्या मोठ्या जागेचा दुसऱ्यांदा प्रस्ताव
पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणारा कालवा भूमिगत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या मोबदल्यात तेवढ्या जागेचा टीडीआर देण्याचा प्रस्ताव यापूर्वी महापालिकेत मंजुरीसाठी आला होता. त्यावरून शहरात वादळ निर्माण झाले होते. नंतर हा प्रस्ताव बारगळला. जलसंपदा विभागाने हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आता ३४ एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या नाईक बेटाचा टीडीआर देण्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, संगमवाडी येथील सिटी सर्व्हे नंबर ९२ आणि ९३ ही जागा नाईक बेट म्हणून ओळखली जाते. मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. पावसाळ्यात अनेकदा हे बेट पाण्याखाली जाते. वनराईने नटलेल्या या बेटावर कोणतीही वस्ती नाही. कैलास स्मशानभूमीपासून या बेटावर जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. त्यामुळे महापालिका यावर काय निर्णय घेणार? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply