सामुहिक कलाविष्कार प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे : रोमार्टिकाद्वारा आयोजित सामुहिक कलाप्रदर्शनाचे उद्घाटन ‘फासोस’ चे सहसंस्थापक कल्लोल बॅनर्जी यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. चित्रकार निशा सप्रे, वैभव गणेश, वसुधा भाटिया, राजेश केदारे, प्रीती शाह व सुबीर दास यांची सौंदर्य व परंपरा या संबंधित आशयघन अशी चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. सामुहिक कलाविष्कार शृंखलेतील हे दुसरे पुष्प आहे. कोरेगाव पार्क येथील मलाईका स्पाइस या कलादालनात उद्या १५ एप्रिल पर्यंत सकाळी १० ते रात्रौ १०.३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे.
या चित्रप्रदर्शनातील चित्रकार निशा सप्रे यांची चित्रे निसर्गाच्या वैभवाची भव्य ओळख करून देतात. ही निसर्गचित्रे मुख्यतः विपुलता व शांतता तसेच समृद्धी यांचा दृश्यानंद सर्वांना देतात. तर चित्रकार वैभव गणेश यांच्या चित्रांमध्ये सागरी तटावरील निसर्गसौंदर्य व त्यातील प्रमुख संकल्पना यांचे दर्शन घडते. तसेच वसुधा भाटिया यांच्या जलरंग व चारकोल माध्यमातील चित्रांमध्ये मानवी मनातील विविध भावनांचे उदात्त असे सादरीकरण केले आहे. यामुळे ही चित्रे त्यातील सौंदर्यस्थळांमुळे व भाव संवेदनांमुळे रसिकांना एक वेगळाच आनंद देतात. तर चित्रकार राजेश केदारे यांच्या चित्रात साधूंची मानसिकता व त्यांचे दिव्य असे भावविश्व यांचे दर्शन घडते. त्रिमिती रचनात्मक शैलीत बनविलेल्या प्रीती शहा च्या कलाकृती सर्व रसिकांना एक आगळीवेगळी अनुभूती देतात. विविध आकार, रचनात्मक संकल्पना व सौंदर्यदृष्टी वगैरेंनी नटलेला हा आविष्कार खरोखर सर्वांना एक वेगळ्याच जगात घेऊन जातो. तर अतिवास्तववादी शैलीचा वापर करून बनवलेली सुबिर दास यांची रचनात्मक चित्रे झाडावरील निवास व त्याचे स्थैर्य आणि आधुनिक जीवनशैली व नागरी विकासामुळे संभवणारा त्या वैभवाचा ऱ्हास ह्या संकल्पनेचे भावपूर्ण उत्कट असे दर्शन घडवतात.
