Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

‘रिक-शो सिनेमा ऑन व्हील्स’ उपक्रमात सहभागी होण्याची पुणेकरांना संधी

पुणे : ‘अलियॉस फ्रॉसेस दे पुणे’, ग्योथे इन्स्टिट्यूट’ पुणे आणि ‘टिआयएफए वर्किंग स्टुडिओ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिक-शो सिनेमा ऑन व्हील्स’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत बोट क्लब रोड येथील ग्योथे इन्स्टिट्यूट – मॅक्स म्युलर भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे.

‘बौंजोर इंडिया २०२२’ या महोत्सवाअंतर्गत हा सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि कलात्मक उपक्रम होणार असून भारतातील फ्रेंच दूतावास, सांस्कृतिक विभाग फ्रेंच इन्स्टिट्यूट, अलियॉस फ्रॉसेस दे पुणे, कॉन्सिलेट ऑफ फ्रान्स, महोत्सवाचे प्रायोजक आणि भागीदार यांचे सहकार्य यास मिळाले आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात पुणेकरांना चाकावरील सिनेमाची जादू अनुभवता येणार आहे. ले जॉन्टी गॅरसोन (जे नाईस गाय या नावाने देखील प्रसिद्ध आहेत) आणि कॉलेज ऑफ आर्किटेक्ट, त्रिवेंद्रम येथील डिझाइन विभाग यांनी विकसित केलेल्या ‘रिक शो’ प्रकल्पात खुल्या पडद्यावर सिनेमा दाखवण्यात येणार आहे. यामधून कला आणि कथाकथन यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होणार आहे. चांगल्या दर्जाचे कलात्मक लघुपट / चित्रपट सामान्य माणसांपर्यंत पोहोचावेत या दृष्टीने ‘रिक-शो सिनेमा ऑन व्हील्स’ या संकल्पनेची निर्मिती करण्यात आली आहे.

रिजनल फंड ऑफ कंटेम्पररी ऑक्सिटेनी माँटपिलिअर, कंटेम्पररी आर्ट फंड ऑफ जिनीव्हा आणि ला जॉन्टी गासोन यांच्या संग्रहालयातील वेगवेगळ्या विषयांवर आधारित कला सिनेमा प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हे सिनेमे रिक्षाच्या मागील बाजूस लावलेल्या मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित केले जातील. ज्यांना या विषयामध्ये किंवा या काळातील चित्रपट पाहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम म्हणजे पर्वणी असणार आहे.

ले जॉन्टी गॅरसोन हे अष्टपैलू कलाकार असून ते चित्रकला, शिल्पकला, सादरीकरण, नावीन्यपूर्ण उपकरणे, व्हीडिओ अशा वैविध्यपूर्ण कला माध्यमांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच आपल्या कलाकृती आणि विविध विषयांमधून ते नवनवीन प्रयोग त्यांनी आतापर्यंत केले आहेत. आपल्या कलाकृतीमधून वेगळा संदेश देऊन नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सन २००६ पासून त्यांनी कला विषयात विविध रचना निर्मिती केल्या असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या कार्याची दखल घेतली जाते आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading